नागपूर - मुंबईत काल (17 जुलै) पहाटेपासून अतिवृष्टीमुळे साधारणतः 385 मिमी पावसाची नोंद झाली असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. संततधार पावसामुळे चेंबूर, विक्रोळी, भांडुप येथे दरड कोसळून आतापर्यंत 30 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यांना मदत जाहीर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत
'काल रात्रीच एनडीआरएफची टीम मदत कार्यात लागली आहे. पावसामुळे मदत कार्यात व्यत्यय येत आहे. चेंबूर व विक्रोळीमधील वस्त्या पहाडी भागात आहेत. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जखमी नागरिकांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. पावसामुळे ज्यांची घरे पडली आहेत, अशा नागरिकांना मदत करण्यात येणार आहे. त्यासाठी 95 हजारापर्यंत मदत करणे शक्य आहे. तातडीची मदत म्हणून 10 हजाराची मदत देणार आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेऊन आहे', असे वडेट्टीवार यांनी सांगितलेत आहे.
विदर्भात पाऊस येण्याची शक्यता
'रेल्वेच्या तीनही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. पाऊस कमी झाल्यावर वाहतूक सुरळीत होईल. यावर्षीचा पाऊस मुंबई भागात जास्त आहे. विदर्भात पाऊस कमी आहे. कोकण, मुंबई सोडून पाऊस इकडे येण्याची शक्यता आहे', असेही त्यांनी म्हटले.
नागपुरात बनणार 1600 कोटींचे स्टेट डिजास्टर केंद्र
'स्टेट डिजास्टर मॅनेजचे नागपूरच्या मिहानमध्ये 10 एकर जागेत 1600 कोटी रुपयांचे केंद्र तयार करतो आहोत. हे भारतातील अद्ययावत सेंटर असेल', असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.
केंद्राचीही मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत
मुंबईतील या दुर्घटनांमधील मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारनेही आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीमधून २ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यासोबतच, या दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
हेही वाचा - मुंबईत 22,483 कुटूंबे जगताहेत जीव मुठीत घेऊन.. 10 वर्षात सरकारकडून दरडींवर उपाययोजनाच नाहीत