नागपूर - यंदा मान्सून राज्यात वेळेत दाखल झाला. सुरुवातीला विदर्भात सर्वत्रच पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे बळीराजाने खरीप हंगामाच्या पेरण्याची जोरदार तयारी केली होती. मात्र आगमनाला बरसलेल्या पावसाने नंतर दडी मारली होती. त्यामुळे नागपूर जिल्ह्यातील पेरण्या खोळबंल्याचे चित्र निर्माण झाले होते. गेल्या दोन दिवसापासून विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी सुखावला आहे. त्यामुळे पेरण्याला वेग आला आहे.
दरवर्षी मृग नक्षत्रात अपेक्षित पाऊस बरसेल या आशेवर शेतकरी असतात, परंतु गेल्या काही वर्षापासून मृग नक्षत्र कोरडं जात असल्याचा अनुभव शेतकऱ्यांना आहे. यंदा मात्र मान्सूनने महाराष्ट्र आणि विशेषतः विदर्भातील नागपूर जिल्ह्यात लवकरच कुच केल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली. दरवर्षी पावसाअभावी पेरण्या लांबत असे, यावर्षी मात्र चित्र काहीस सुखकर पहायला मिळत आहे. सोयाबीन, कापूस, तूर ही प्रमुख पिके जिल्ह्यातील शेतकरी घेतात. विशेषतः कापूस लागवडीवर अधिक भर असतो आणि कापूस लागवडीसाठी अधिक पावसाची आवश्यकता असल्याने त्या पार्श्वभूमीवर शेतकरी आपली तयारी करत असतात. यंदा मात्र सोयाबीन पेरणीला शेतकरी अधिक पसंती देत आहे.
जिल्ह्यात यावर्षी ७८ हेक्टर इतके क्षेत्र सोयाबीन लागवडीचा असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. असे असले तरी सोयाबीन बियाणे खराब निघत असल्याने शेतकरी संभ्रमीत झाला आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे, अशा अवस्थेत सध्या शेतकऱ्यांना अनेक प्रश्नांना तोंड द्याव लागत आहे. अशातच शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहे. अनेक वेळा पावसाचा अंदाज न आल्याने पेरणी कामे पुढे ढकलावे लागतात, यावर्षी देखील ऐन पेरणीच्या काळात पावसामुळे शेतकऱ्यांना पेरणी थांबवावी लागली. मात्र हळूहळू का होई ना आज संपूर्ण जिल्ह्यात पेरणीची कामे पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे.