नागपूर - मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जीवनावश्यक वस्तूंसह निवासी संकुलमधील आणि रहिवाशी परिसरातील होजिअरी, स्टेशनरी दुकाने, इन सिटू बांधकाम आणि 10 टक्के कर्मचारी उपस्थितीसह शासकीय कार्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे माजी महापौर आणि भारतीय जनता पक्षाचे नागपूर शहराध्यक्ष प्रवीण दटके यांनी स्वागत केले.
शहरातील प्रतिबंधित चार प्रशासकीय झोनमध्ये मात्र संपूर्ण लॉकडाऊन राहील, फक्त सहा झोनमध्ये ही परवानगी देण्यात आली आहे. पण, खासगी कार्यालये, दारूची दुकाने, बार, मॉल, हॉटेल्स हे पूर्णपणे बंद राहतील. तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू झाल्यावर राज्य सरकारने लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता जाहीर केली होती. मात्र, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूर शहरात कुठलीही शिथिलता न देण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे भाजपने त्यांच्यावर टीका केली होती. एवढेच काय तर त्यांच्या निर्णयाला नागपूर खंडपीठात आव्हान देखील देण्यात आले. त्यामुळे मुंढे यांनी 24 तासात आपला निर्णय बदलविला. भाजपने त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले.