नागपूर - शहरातील गणेश टेकडी मंदिर हे विदर्भातील एक मोठे देवस्थान आहे. कोरोनामुळे आज गणेश टेकडीवर निरव शांतता पहायला मिळत आहे. मंदिरात मोजक्याच विश्वस्ताच्या हस्ते पुजा पार पडली असून दर्शनासाठी एकावेळी 5 भाविकांना प्रवेश देण्यात येत आहे.
राज्यात कोरोनामुळे सर्वच मंदिरे बंदच आहेत. या परिस्थितीमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा हिरमोड होत असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. नागपूरातही प्रसिद्ध गणेश टेकडी मंदिरात निरव शांतता पहायला मिळत आहे. विदर्भातील एक प्रसिद्ध गणेश मंदिर म्हणून गणेश टेकडीचा उल्लेख होतो. दरवर्षी गणेश चतुर्थीला भाविकांची मोठी रांग येथे पहायला मिळते. परंतु कोरोनामुळे यंदा मात्र मंदिर परिसरात शांतता पहायला मिळत आहे. मोजक्याच मंदिर विश्वस्तांच्या हस्ते पुजा पार पडली. शिवाय गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर भाविकांचा हिरमोड होवू नये, म्हणून एकावेळी 5 व्यक्तींना प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे मोजकीच माणसं या मंदिर परिसरात पहायाला मिळत आहे.
गणेश टेकडीला खूप मोठी परंपरा आहे. नागपूरात येणारा प्रत्येक व्यक्ती गणेश टेकडीला भेट देतो. परंतु, यंदा गणेशोत्सवालाच मंदिर बंद असल्याने येथे येणाऱ्यांची संख्या देखील विरळच पहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक गणेश भक्तांना प्रसिद्ध गणेश टेकडी दर्शनाला मुकावं लागत आहे. शिवाय मंदिरात गर्दी होवू नये, म्हणून मंदिर विश्वस्तांकडून देखील तितकीच काळजी घेतल्या जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे येथे येणारा प्रत्येक भाविक गणराया समोर नतमस्तक होत कोरोनाच विघ्न लवकर बरं होवो ही प्रार्थना करत आहे.