नागपूर- सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करत नागपूरच्या रामनगर येथील प्रसिद्ध राम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. एरवी लाखोंच्या गर्दीत रामाचा जन्मोत्सव साजरा केला जायचा. मात्र, यावर्षी कोरोना विषाणूचे संकट गडद झाल्याने अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थित जन्मोत्सव सोहळा पार पडावा लागला आहे.
हेही वाचा- धक्कदायक..! घशात चॉकलेट अडकल्याने गुदमरून चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
राम जन्मोत्सव म्हटले की, नागपूरमध्ये अभूतपूर्व उत्साह संचारल्याचे बघायला मिळतो. मात्र, यावर्षी सर्व परंपरांना बाजूला सारून अगदी साधेपणाने राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. नागपुरात पोदारेश्वर राम मंदिराला तर सव्वाशे वर्षांची परंपरा आहे. शिवाय राम नगर येथील राम मंदिराला सुद्धा मोठा इतिहास आहे. या दोन्ही मंदिरात लाखो राम भक्तांच्या उपस्थितीत नयनरम्य सोहळा आयोजित केला जातो. यावर्षी कोरोना विषाणूचे संकट संपूर्ण जगावर आल्याने आपला देशही यातून सुटलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानुसार संपूर्ण नागपूरकर लॉक डाउनचे तंतोतंत पालन करत आहे. त्यामुळे आज नागपूरकरांनी राम मंदिरांमध्ये कोणतीही गर्दी केली नाही.
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारून लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज नववा दिवस आहे.