नागपूर - इंधन दरवाढीच्या विरोधात काल संपूर्ण राज्यभरात शिवसेनेकडून आक्रमक आंदोलन करण्यात आले. मात्र, नागपुरात तब्बल एक दिवसाच्या उशिराने म्हणजेच आज इंधन दरवाढीचा विरोध करण्यासाठी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांसोबत महिलांचाही समावेश होता. आंदोलकांनी दुचाकी एका बैलगाडीवर ठेवली आणि ती बैलगाडी ओढत या इंधन दरवाढीचा विरोध केला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आंदोलनासंदर्भात वेळेवर सूचनाच मिळाली नसल्याने आंदोलन करण्याकरिता उशीर झाल्याची माहिती शिवसेनेचे नेते प्रमोद मानमोडे यांनी दिली आहे.
राज्यभरात काल आंदोलन
काल संपूर्ण राज्यात भारतीय जनता पक्षाने वीज दरवाढीच्या विरोधात केलेल्या हल्लाबोल आंदोलनाला उत्तर देण्याकरीता शिवसेनेकडून देखील इंधन दरवाढीचा मुद्दा घेऊन आंदोलन करण्यात आले होते. काल नागपुरात भारतीय जनता पक्षाकडून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात हल्लाबोल आंदोलनाचे आयोजन करून विविध केंद्रांना टाळे ठोकण्यात आले. मात्र, भाजपच्या आंदोलनाला नागपुरात उत्तर देण्याकरिता शिवसेनेच्या मोठ्या नेत्यांकडून आंदोलन करण्यात आले नव्हते. त्यामुळे आज पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात आंदोलन करून कालची कसर भरून काढण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांकडून करण्यात आला.
आंदोलनाची सूचनाच उशिरा मिळाली
संपूर्ण राज्यात शिवसेनेकडून पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरवाढीविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. मात्र, नागपुरातील पदाधिकाऱ्यांना आंदोलनासंदर्भात सूचनाच उशिरा मिळाल्याने काल आंदोलन होऊ शकले नाही, अशी माहिती जिल्हा संघटक प्रमोद मानमोडे यांनी दिली आहे.
हेही वाचा - पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात शिवसेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा