नागपूर - पहिल्या टप्प्यात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीकरता प्रचार सभा आणि प्रचार रॅलीचे दिवस आता आटोपत आलेत. त्यामुळे प्रचराची लगीन घाई सर्वत्र दिसत आहे. विदर्भातील भाजप आणि काँग्रेस नेत्यांच्या सभांनंतर आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आज पासून (७ एप्रिल) विदर्भात एकूण ४ लोकसभा क्षेत्रात सभा होणार आहेत. आजची सभा रामटेक लोकसभा मतदारसंघाचे उमेद्वार कृपाल तुमाने यांचा प्रचारार्थ कळमेश्वर आणि कन्हान या ग्रामीण भागात होणार आहे. विशेष म्हणजे एकही सभा भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी घेतली जाणार नाही.
उद्धव ठाकरे विदर्भात रामटेक, यवतमाळ, अमरावती आणि बुलडाणा अशा चार लोकसभा मतदारसंघात सभा घेणार आहेत. या चारही मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार आहेत. राज्यात भाजप आणि शिवसेनेची युती आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी कुठे संयुक्त, तर कुठे स्वतंत्र सभा घेण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभांना युतीच्या उमेदवारांकडून जास्त मागणी आहे. कारण त्यांच्या सभांचा प्रभाव जनतेवर पडतो. मात्र, उद्धव ठाकरे यांनी विदर्भात केवळ शिवसेनेच्या उमेदवारांसाठीच सभा घेण्याचे ठरवले आहे.
रामटेक - कृपाल तुमाणे
यवतमाळ - भावना गवळी
अमरावती - आनंदराव अडसूळ
बुलडाणा - प्रतापराव जाधव