नागपूर - जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर, बहुतांश गावांमध्ये पूरस्थिती अद्याप कायम आहे. मात्र, अशा परिस्थितीत अनेक नागरिक गावांमध्येच अडकले होते. त्यांना वाचवण्यासाठी एसडीआरएफच्या पथकांनी बचाव कार्य सुरू केले आहे. पथकांनी जिल्ह्यातील ३६ गावांमधील तब्बल १४ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.
जिल्ह्यात बरसलेल्या पावसामुळे पेंच, तोतलाडोहच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे, या धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. शिवाय दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील कन्हानसह प्रमुख नद्यांना देखील पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरल्याने नागरिक गावातच अडकले होते. त्यानंतर एसडीआरएफच्या पथकांनी बचाव कार्याला सुरुवात केली. कालपासून सुरू असलेल्या या बचाव कार्यात आतापर्यत कामठी, कन्हान व इतर ३६ गावातील १४ हजार नागरिकांना पुरातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. शिवाय हे कार्य अजूनही सुरूच असल्याची माहिती समोर आली आहे.
शिवाय अनेक गावांशी अद्यापही संपर्क न झाल्याने प्रशासनाकडून मदतीसाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांची घरे अजूनही पाण्याखाली आहे. पूरग्रस्त नागरिकांना खूप नुकसान झाले आहे. शिवाय, शिवारातील शेती पाण्याखाली गेल्याने पिके देखील उद्धवस्त झाली आहेत. पूर परिस्थिती अद्याप कायम असून प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा- नागपूर पूर: राज्य शासनाने पूरग्रस्तांना तात्काळ मदत करावी; चंद्रशेखर बावनकुळेंची मागणी