नागपूर - संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासाठी कौशल्य विकास विभाग बेरोजगार युवक युवतींना आरोग्य क्षेत्रातील प्रशिक्षण देणार आहे. यासाठी १ जूनपासून सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, कौशल्य विकास विभागाचे सहायक संचालक प्रभाकर हरडे, विदर्भ हॉस्पिटल असोशिएनचे सचिव डॉ. अनुप मरार, आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय देवतळे उपस्थित होते.
५ उमेदवारांसाठी सुध्दा प्रशिक्षण -
वैद्यकीय क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची सद्धा वाणवा आहे. कोविडमध्ये डॉक्टरांसोबतच नर्सेस, परिचारिका, तसेच पॅरामेडीकल स्टाफची गरज मोठ्या प्रमाणावर आहे. ती गरज पूर्ण करण्यासाठी व तिसऱ्या लाटेत प्रशिक्षित मनुष्यबळाच्या पूर्ततेसाठी हे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. १ जूनपासून प्रशिक्षण सूरू होणार असून महास्वयम ॲपव्दारे रूग्णालयांना कोर्सनिहाय प्रशिक्षणासाठी नोंदणी करता येईल. अगदी ५ उमेदवारांसाठी सुध्दा प्रशिक्षण दिले जाणार आहे.
प्रशिक्षण संस्थांना ग्रीन चॅनेल म्हणून सूचीबध्द करणार -
राज्य कौशल्य सोसायटी नोडल असणाऱ्या या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी ५५ अभ्यासक्रम निश्चित करण्यात आले आहे. १०० ते १ हजार तासांचे प्रशिक्षण अभ्यासक्रम निहाय उमेदवारांना देण्यात येईल. यासाठी उमेदवाराचे वय 15 ते 45 दरम्यान असावे. सर्व उमेदवारांसाठी प्रशिक्षण निशुल्क आहे. हेल्थकेअर, मेडीकल, नर्सिग, वाहनचालक, रूग्णवाहिका चालक या अभ्यासक्रमाचाही यात समावेश आहे. वैद्यकीय व आरोग्य क्षेत्रांशी संलग्नित मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यास मान्यता देण्याबाबतचा १९ मे २०२१ शासन निर्णय करण्यात आला आहे. यानुसार जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालये व २० बेडपेक्षा अधिक सुविधा असलेल्या खासगी रुग्णालयांना किंवा वैद्यकीय संस्थांना व्यावसायिक प्रशिक्षण संस्थाना ग्रीन चॅनेल म्हणून सूचीबध्द करण्यात येणार आहे. त्यांच्या आवश्यकतेनुसार हे खासगी रुग्णालय तरुणांना प्रशिक्षित करतील.
प्रशिक्षणासाठी जागा देखील उपलब्ध करून देणार -
कोविड व म्युकरमायकोसिसच्या आव्हानात्मक काळात वैदयकीय क्षेत्राला प्रशिक्षीत मनुष्यबळ पुरविण्याच्या दृष्ट्रीने कौशल्य विकासचा हा प्रयत्न उत्तम असून याला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेव्दारे मदत करण्यात येईल असे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी सांगितले. खासगी इस्पितळांना प्रशिक्षणासाठी जागा नसल्यास ती उपलब्ध करून देण्याचे विदर्भ हॉस्पिटल असोशिएनचे सचिव डॉ. अनुप मरार यांनी आश्वस्त केले. तर प्रशिक्षित मनुष्यबळासाठी आयएमएचे सहकार्य राहण्याची ग्वाही आयएमएचे अध्यक्ष डॉ.संजय देवतळे यांनी यावेळी दिली.
हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष: जाणून घ्या राज्यात खरीप पिकांचे नियोजन कसे?