नागपूर - प्रणव मुखर्जी नागपूरला संघाचा वर्ग पाहायला आले होते. त्यावेळी प्रणवदा यांनी स्वतःहून स्वतःची ओळख दिली होती. त्यावेळी प्रत्येक स्वयंसेवक अवाक् झाला होता. प्रत्येकाला त्यांच्या साधेपणाची आणि सामाजिकतेची खात्री पटली होती. ते अनुभवी, परिपक्व विचारवंतही होते. ते आमच्यासारख्या लोकांसाठी मार्गदर्शक वडीलधारी होते, अशा शब्दात सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. तसेच त्यांना श्रद्धांजली वाहिली.
प्रणव मुखर्जी राष्ट्रपती असताना दोन वेळा आणि त्यानंतर सुद्धा तीन ते चार वेळा मोहन भागवत यांनी प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली होती. पहिल्याच भेटीत त्यांच्या आत्मीय आणि उदार स्वाभाविक व्यवहाराने मला विसर पडला की मी देशाच्या राष्ट्रपतीसोबत बोलतो आहे. घरातील एखाद्या वृद्ध सदस्यासोबतच बोलतो असल्याचा भास झाल्याचे मोहन भागवत म्हणाले. त्यांचा हा व्यवहार सदा, सर्वदा आणि सर्वांसाठी होता, असेही भागवत म्हणाले.
सोमवारी सायंकाळी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन झाले. त्यांना १० ऑगस्टला दिल्लीतील लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली. उपचारादरम्यान त्यांना कोरोनाची देखील लागण झाली होती. त्यांना फुफ्फुसामध्ये संसर्ग झाला होता. ते कोमामध्ये गेले होते. सोमवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले.