नागपूर - वाळू तस्करी करणाऱ्या वाळू माफियांनी महसूल अधिकाऱ्यांवर गाडी चढवून चिरडण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. ही घटना वाठोडा परिसरातील रिंग रोडवर आज सकाळी घडली. प्रसंगावधान राखून तहसीलदार आणि पथकाने बाजुला सरकल्याने थोडक्यात बचावल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान महसूल पथकाला शिवीगाळ करत माफियांनी कारने पळ काढला.
नागपूर शहरालगत असलेल्या वाठोडा परिसरातील रिंग रोडवर आज सकाळी 9 वाजता वाळू माफियांवर कारवाईसाठी तहसीलदार सुनील साळवे आणि त्यांचे पथक तपासणी करत होते. यावेळी विरुद्ध दिशेने मर्सिडीज गाडी पथकाच्या अंगावर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र प्रसंगावधान ओळखून तहसीलदार साळवेसह संपूर्ण पथक बाजूला सरकल्याने थोडक्यात वाचल्याची माहिती तहसीलदार सुनील साळवे यांनी दिली.
मर्सिडीजमधील तरुणांनी तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना रॉयल्टी दाखविण्यास विरोध केला. त्यानंतर पथकाला शिवीगाळ करत तिथून पळ काढला. पथकांनी मर्सिडीजचा पाठलाग केला, मात्र वाळू माफिया पळून जाण्यात यशस्वी झालेत. घटनेची तक्रार नंदनवन पोलीस ठाण्यात करण्यात आली. वाळू माफिया विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मर्सिडीजच्या क्रमांकावरुन आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण यांनी दिली आहे.
वाळू माफियांवर प्रशासनाने सुरु केलेल्या कडक कारवाईनंतर आता उद्दाम माफियांनी थेट तहसीलदार आणि सरकारी यंत्रणेला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी आता यावर कडक उपाययोजना न केल्यास या वाळू माफियांना आवरणे अवघड होणार असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांमध्ये उमटू लागली आहे.