नागपूर : शहरातील एका खून प्रकरणात अद्याप महिलेचा मृतदेह मिळालेला नसला तरी रोज नवनवीन खुलासे होताहेत. या महिलेचाचा हनी ट्रॅपमध्ये वापर करून तिच्या पतीनं मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमधील अनेक पुरुषांना टार्गेट केलं. त्यांना ब्लॅकमेल करून कोट्यवधी रुपये कमावले, अशी माहिती नागपूर पोलिसांनी दिली. आरोपी हा पत्नीला तिच्या ओळखीच्या लोकांकडे पाठवून अश्लिल व्हिडिओ आणि फोटो काढण्यास सांगायचा. त्यानंतर त्या फोटो व व्हिडिओच्या मदतीने पती आणि त्याचे सहकारी लोकांना व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळायचे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सदर महिलेच्या आईने रविवारी नागपूर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मुलीला धमकावून सेक्सटॉर्शन रॅकेटमध्ये सामील होण्यास भाग पाडल्याचा आरोप पीडितेच्या आईने केला आहे. या तक्रारीवरून तिचा पती आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणातील महिला एका राजकीय पक्षाशी संबंधित होती. आपल्या पतीला भेटण्यासाठी 1 ऑगस्ट रोजी मध्यप्रदेशात निघाल्यानंतर ही महिला बेपत्ता झाली. त्यानंतर तिच्या आईनं मुलगी बेपत्ता झाल्याची पोलिसात तक्रार दाखल केली होती.
सायबर विभागाच्या मदतीने तपास : अश्लिल व्हिडीओ व फोटोद्वारे आरोपीने व त्याच्या जबलपूर, नागपुरच्या साथीदारांची भरपूर लोकांकडून जबरदस्तीनं कोट्यवधी रुपये वसूल केले आहेत. आरोपींविरुद्ध कलम 384, 386, 389, 354 (डी), 120(ब), 34 भादंवि सह कलम 66 (ई), 67, 67(अ) आय. टी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या तपासात सायबर विभागाकडून तांत्रिक मदत घेतली जात आहे.
'असा' आहे घटनाक्रम : या प्रकरणातील दोघांचे अलिकडेच लग्न झाले होते. ते बिझनेस पार्टनर देखील होते. यातील पतीच्या व्यवसायात या महिलेने गुंतवणूकही केली होती. तसेच तिने तिच्या पतीला सोन्याचे दागिने देखील गिफ्ट केले होते. पतीने दागिने विकल्याचा संशय पीडितेला आला होता. त्यामुळे पैशाचा व्यवहार आणि दागिन्यांविषयी विचारणा केल्यावर दोघांमध्ये मोठं भांडण झालं. रागाच्या भरात पतीने लोखंडी रॉड पीडितेच्या डोक्यावर मारून तिची हत्या केली.
आरोपी करतोय दिशाभूल : या प्रकरणातील पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपीला मध्यप्रदेशात अटक करून नागपूरला आणले आहे. त्याने पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली आहे. परंतु तो वारंवार वेगवेगळी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करतोय, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पतीपत्नी यांच्यातील संबंध तिच्या चारित्र्याबद्दल संशय वाढल्यानंतर बिघडले होते. जबलपूर येथील पतीच्या घरी या मुद्द्यावरून जोरदार वाद झाल्यानंतर त्याने तिची हत्या केली. पतीव्यतिरिक्त, पोलिसांनी पीडितेच्या हत्येप्रकरणी इतर दोघांना जबलपूर येथून अटक केली आहे.
हेही वाचा :