नागपूर : नागपुरातील भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्या सना खान यांच्या हत्येला जवळपास पंधरा दिवस उलटले आहेत. मात्र, पोलिसांना अद्याप सना खान यांचा मृतदेह सापडलेला नाही. दोन दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यात एका महिलेचा मृतदेह विहिरीत सापडल्याची माहिती नागपूर पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे नागपूर पोलिसांचे एक पथक सना खान यांच्या कुटुंबासह हरदा येथे गेले होते. मात्र, हा मृतदेह सना खान यांचा नसल्याची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली आहे. हा मृतदेह सना खान यांचाच आहे, हे निश्चितपणे सांगता येणार नाही. त्यामुळे आता मृतदेहाची डीएनए चाचणी केली जाईल, त्यानंतर नेमकी परिस्थिती स्पष्ट होईल, असे नागपूर शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले आहे.
पोलिसांना तपासात अडचणी : नागपूर भाजपाच्या स्थानिक नेत्या सना खान 1 ऑगस्ट रोजी मध्य प्रदेशातील जबलपूर येथे गेल्या होत्या. 2 ऑगस्टनंतर सना खान यांच्याशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी सना खान बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. जबलपूर येथील अमित साहूसोबत सना खान यांचे कडाक्याचे भांडण झाले होते. आरोपी अमित याने रागाच्या भरात सना खान यांच्या डोक्यात वार करून त्यांची हत्या केली होती. त्यानंतर सना खान यांचा मृतदेह अमित साहूने हिरण नदीत फेकून दिल्याचे सांगितले होते. गेल्या आठ दिवसांपासून सना खानच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. मात्र सना खान यांचा मृतदेह अद्याप सापडला नसल्याने पोलिसांना तपासात अडचणी येत आहेत.
आरोपीकडून पोलिसांची दिशाभूल : सना खान यांची हत्या करणारा आरोपी अमित साहूला अटक करून नागपुरात आणण्यात आले आहे. अमित साहूने सना खान यांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. मात्र, तो वारंवार वेगवेगळी माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करत असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
'त्या' मृतदेहाची होणार 'डीएनए' चाचणी : 2 ऑगस्ट रोजी सना खान यांची हत्या केल्यानंतर मृतदेह जबलपूरच्या हिरण नदीत फेकून दिल्याची माहिती आरोपीने पोलिसांना दिली होती. त्यानुसार जबलपूर पोलिसांचे पथक आठ दिवसांपासून हिरण नदीत मृतदेहाचा शोध घेत आहेत. मात्र, अद्याप सना खान यांचा मृतदेह हाती लागलेला नाही. त्यानंतर हरदा येथील विहिरीत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह सना खान यांचा असावा असा पोलिसांना संशय आहे. मात्र, सना खान यांच्या कुटुंबीयांना मृतदेहाची ओळख पटवली नसल्याने मृतदेहाची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे.
असा आहे घटनाक्रम : सना खान 1 ऑगस्टला मध्य प्रदेशातील जबलपूरला गेल्या होत्या. 2 ऑगस्टनंतर त्यांच्याशी कुटुंबाचा संपर्क होऊ शकला नव्हता. त्यामुळे सना खान बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबाने पोलिसात नोंदवली होती. अमित साहूसोबत सना खान यांनी लग्न केले होते. तसेच अमित सना खान यांच्या व्यवसायात भागीदारही होता. सना खान यांनी अमितच्या दमुआ येथील 'आशीर्वाद' नावाच्या ढाब्यात पैसे गुंतवले होते. तसेच सना खान यांनी अमितला सोन्याचे दागिनेही भेट दिले होते. अमितने दागिने विकल्याचा संशय सना खानला आला होता. त्यामुळे सना यांनी जबलपूरला जाऊन पैशाचा व्यवहार, दागिन्यांची चौकशी केली होती. त्यामुळे त्यांच्या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. त्यामुळे रागाच्या भरात अमित साहूने सना खान यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून त्यांची हत्या केल्याचे सांगितले होते.
हेही वाचा -