नागपूर - राज्यात कोरोनाचा नवीन स्ट्रेन डेल्टा प्लसमुळे नवे संकट निर्माण झाले आहे. राज्यात काही जिल्ह्यात डेल्टा प्लसचे रुग्ण मिळून आले असून नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथेही संशयित मिळून आले आहेत. मुंबईतून गावी परत आलेल्या तरुणीपासून तिच्या कुटुंबातील 7 सदस्यांना नवीन स्ट्रेनची लागण असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यात कुटुंबातील 8 सदस्याचे नमुने हे जिनोम सिक्वेसिंग चाचणी करण्यासाठी पाठवण्यात आले आहेत.
दोन-तीन दिवसात अहवाल येणे अपेक्षित -
या नमुन्यावर हैद्राबादच्या सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी लॅब आणि नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था(निरी) या दोन्ही संस्थेच्या लॅबमध्ये जिनोम सिक्वेसिंग तपासणी केली जात आहे. येत्या दोन-तीन दिवसात अहवाल येणे अपेक्षित आहे.
मुंबईतून गावाला परत आलेल्या तरुणीपासून कुटुंबियांना बाधा -
नागपुर जिल्ह्यातील उमरेड येथील ती तरुणी मुंबईत नौकरीच्या निमित्याने राहत होती. यात काही दिवसांपूर्वी ती कुटुंबातील लग्न समारंभासाठी गावी परत आली. यावेळी तिला काही लक्षणे आल्याने तिची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये तीचा अहवाला हा पॉझिटिव्ह आला. यानंतर कुटुंबातील सदस्यांची चाचणी केली असताना एकूण आठ जणांना कोरोनाची लागण झाली. यामुळे एक व्यक्तीपासून सात जणांना लागण झाल्याने नविन व्हेरियंट तर नाही ना? असा संशय प्रशासनाला आल्याने त्यांनी व्हेरीयंट तपासनी करण्याचे ठरवले.
काय आहे जिनोम सिक्वेसिंग -
यात जिनोम सिक्वेसिंग म्हणजे त्या व्हायरसचा एक प्रकारचा बायोडाटा असतो. तो व्हारस कसा आहे, कसा दिसतो, त्याचा प्रभाव, लक्षणे या सर्व बाबींची माहिती जिनोम सिक्वेसिंग करुन मिळवली जाते. यात मानवी शरीरात असलेले अनुवांशिक तत्व म्हणजे डीएनएचा समूहाला जिनोम म्हटले जाते. तसेच व्हायरसच्या बाबतीत जीन असतात.
येत्या तीन दिवसात अहवाल येणार -
यात नागपुरात आढळलेल्या आठही बाधितांचे नमुने हे निरी संस्थेत जिनोम सिक्वेसिंग करून कोणता नवीन व्हेरियंट आहे तपासले जाणार आहे. यात मागील काळात आता पर्यंत 400 पेक्षा जास्त नमुन्यांचे जिनोम सिक्वेसिंग करून अहवाल दिला आहे. हे काम निरीच्या पर्यावरण आणि विषाणूजन्य विभागाचे वैज्ञानिक डॉ. क्रिष्णा खैरनार यांच्या नेतृत्वात केल्या जाते. यातही हा व्हायरस डेल्टा प्लस आहे का नाही याचा अहवाल दोन ते तीन दिवसात मिळण्याची शक्यता असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.
हेही वाचा - Delta Plus : एक रुग्ण गेला कुठे? राज्य आणि केंद्र सरकारच्या आकडेवारीत तफावत