नागपूर - शहरातील बेसा-बेलतरोळी परिसरात आज सलून कारागीर असलेल्या शैलेश नक्षणे नामक व्यक्तीने सलूनमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. टाळेबंदीमुळे आर्थिक संकट ओढवल्याच्या नैराशेतून शैलेशने आत्महत्या केल्याची माहिती त्याच्या सहकाऱ्यांनी दिली. तर कौटुंबिक कारण देखील आत्महत्येमागे असू शकते अशी देखील शंका व्यक्त केली जात आहे.
शैलेश नक्षणे हा तरुण बेसा परिसरातील एका सलूनमध्ये कारागीर म्हणून कामाला होता. लॉकडाऊनमुळे ग्राहक नसल्याने त्याचे आर्थिक उत्पन्न कमी झाल्याने आर्थिक चणचण भासू लागली होती, ज्यामुळे त्याच्या घरात वाद देखील सुरू झाले होते. घटनेच्या वेळी शैलेश तो काम करत असलेल्या जुन्या दुकानात गेला होता. त्या ठिकाणी असलेल्या मित्रांची भेट घेतल्यानंतर मला बरे वाटत नसल्याने सांगून तो दुकानाच्या वरच्या भागात असलेल्या खोलीत आराम करण्यासाठी गेला होता.त्यावेळी त्याने त्या ठिकाणी गळफास घेऊन आत्महत्या केली.
आर्थिक अडचणीतून शैलेशने आत्महत्या केल्याची शंका त्याच्या मित्रांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार बेलतरोडी पोलिसांनी चौकशीला सुरूवात केली आहे.