नागपूर - लॉकडाऊनच्या काळात नागपुरात अडकलेल्या व गरजू विद्यार्थ्यांसाठी नागपूर विद्यापीठ समोर आले आहे. घरापासून दूर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने हेल्पलाईन सुरू केली आहे. सोबतच शिक्षणासाठी नागपुरात भाड्याने खोली घेऊन राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिधा वाटप देखील सुरू केले.
लॉकडाऊनच्या घोषणेनंतर वसतिगृहात राहणारे अनेक विद्यार्थी त्यांच्या मूळगावी निघून गेले. मात्र, भाड्याने खोली घेऊन विद्यापीठात शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी या लॉकडाऊनमध्ये अडकले आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे सुद्धा अनेक विद्यार्थी अभ्यासात खंड पडेल म्हणून नागपुरातच राहिले. परंतु, लॉकडाऊनची मुदत आणखी वाढल्याने आता या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. खासगी खानावळ बंद असल्याने या विद्यार्थ्यांच्या भोजनाची गैरसोय सुरू झाली आहे. संचारबंदीमुळे ज्या विद्यार्थ्यांची गौरसोय होत आहे, त्यांनाही मदत पुरवण्याची मागणी विद्यापीठाच्या काही सिनेट सदस्यांकडून करण्यात आली. ज्यानंतर विद्यापीठाने तीन सदस्यांची समिती नियुक्त करून त्यांचे फोन क्रमांक विद्यापीठाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
ज्या गरजू विद्यार्थ्यांना धान्य, किराणाची गरज आहे, त्यांना धान्याची किट उपलब्ध करून देण्यात येत आहेत. आतापर्यंत अशा सुमारे दोनशे विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे याची नोंदणी केली आहे. यासोबतच संचारबंदीमध्ये विद्यार्थांचे मानसिक व शारीरिक आरोग्य चांगले राहावे, यासाठी विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागातर्फे समुपदेशनाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर एक अर्ज विद्यार्थांना भरायचा आहे. ज्यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाइन समुपदेशन करण्यात येणार आहे.