नागपूर - जिल्ह्यात राईट टू एजूकेशन ( आरटीई ) म्हणजेच 'शिक्षण हक्क' कायद्याअंतर्गत जवळपास २७ हजार अर्ज पालकांनी भरले आहेत. नागपूर जिल्ह्यात आरटीईची सवलत असलेल्या ६७५ शाळा आहेत. या शाळांमध्ये २५ टक्के सवलत प्रवेशामध्ये दिली जाणार असून या शाळांमध्ये एकूण ७ हजार २०४ जागा राखीव आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये ५ हजार ७०१ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. अर्जाच्या संख्येच्या बाबतीत महाराष्ट्रात सर्वात जास्त अर्ज नागपूर जिल्ह्यातून करण्यात आले आहेत.
बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी, शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत २५ टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. या अंतर्गत नागपूर जिल्ह्यात अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्जाच्या बाबतीत नागपूर जिल्हा महाराष्ट्रात प्रथम क्रमाकांवर असून समित्यांमार्फत विद्यार्थ्यांची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे.
ज्या शाळा आरटीईच्या राखीव जागांवरील प्रवेशास पात्र असतील त्या शाळेने RTE Portal वर रजिस्ट्रेशन करावे, असे न केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. तसेच प्रवेशासाठी गेल्यावर शाळेने कोणतेही कारण नसताना प्रवेश नाकारला तर पालकांनी याबाबत तक्रार नोंद केली. तर त्यांची चौकशी करून याबाबत कायद्यातील तरतुदीनुसार शाळेची मान्यता रद्द करण्याची कारवाई करणार असल्याचे शिक्षणअधिकारींनी सांगितले.