नागपूर - राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढविल्या आहेत. जिल्ह्यात २ दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि कापूस, सोयाबीन सारखे हाती आलेले पीक खराब झाले. हे पीक कापणी करून बाजारात विकायला नेण्याआधीच पावसाने कहर केल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. यामुळे शेतकऱ्यांची यावर्षीची दिवाळी अंधारातच गेली असली तरी राजकारणी मात्र सत्ता स्थापनेच्या कार्यात व्यस्त आहेत.
निसर्गाचा लहरीपणा नेहमीच शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. यावेळी पाऊस उशिरा झाल्याने पेरणीला उशीरा सुरुवात झाली. मात्र, त्यानंतर परिस्थिती चांगली झाली आणि पिके दिसायला लागल्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या. कापसाचे पीक चांगले येईल, दिवाळी साजरी होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर पाणी फेरले आहे.
विदर्भात सर्वत्र परतीच्या पावसामुळे नुकसान झाल्याचे चित्र आहे. कुठे सोयाबीन लोळायला लागला तर कुठे कापसाची बोंड काळवंडली, काही फुटली आणि कापूस खराब झाला. धान ओले होऊन त्याला कोंब आले तर, तूर सोबतच इतर पिकांचीसुद्धा नासाडी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांनी या संकटाचा सामना करतच जगायचं का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हेही वाचा - नागपुरातील कुख्यात गुंड संतोष आंबेकरची संपत्ती जप्त
कधी ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, आस्मानी संकट तर कधी अवकाळी पाऊस असे सगळे प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे आहेत. तर, पिकांच्या नुकसानभरपाईसाठी शेतकरी आस लावून बसला असताना राजकारणी मात्र सत्ता स्थापनेच्या कार्यात व्यस्त आहेत. त्यामुळे या बळीराजाची व्यथा कोणी ऐकणार का हा प्रश्न निर्माण होत आहे.
हेही वाचा - चंद्रशेखर बावनकुळे यांना मुख्यमंत्री करा, आशिष देशमुख यांची भाजपकडे मागणी