मुंबई : २१ फेब्रुवारीला विशेष बाल पोलीस कक्ष (SJPU) कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार कदम आणि पोलीस पथकाने स्वंयसेवी संस्थेचे मदतीने धोबी घाट, नुरुहोदा मस्जिदनवळ, दुसरा मजला, मौलाना आझाद रोड, मदनपुरा, नागपाडा येथील नुरुल बॅग कारखाना, नुरर्सद बॅग कारखाना, शफिआलम बॅग कारखाना, खुर्शिद बॅग कारखाना आणि मोहमद बॅग कारखाना अशा एकूण ५ बॅग कारखान्यांवर छापा कारवाई करून या आस्थापनेमधून तयार बॅगेचे धागे कटींग करण्याचे काम करीत असलेल्या तीन नेपाळी अल्पवयीन बालकांसह एकुण आठ अल्पवयीन बालकांची बालमजूरीतून मुक्तता करण्यात आली आहे. या कारवाईत आस्थापनांच्या मालकास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी नागपाडा पोलीस ठाण्यात आस्थापनेच्या मालकावर कलम ७५, ७९ बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
समता नगर येथून पाच बालमजुरांची सुटका : मुंबईतील समतानगर परिसरातून ५ अल्पवयीन बालकांची बालमजुरीतून सुटका करण्यास मुंबई पोलिसांना यश मिळाले. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विशेष बाल पोलीस कक्षाने ही कारवाई केली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात विविध कारखाने, हॉटेल्स आस्थापना येथे छुप्या पध्दतीने बालकांना कामावर ठेवले जाते. या आस्थापनेची गोपनीय माहिती प्राप्त करून त्यांच्यावर कारवाई करून बाल कामगारांची सुटका करण्याबाबत वरिष्ठांचे आदेश प्राप्त झाले होते. मुंबई या शाखेस मुंबई शहरातील समतानगर परिसरात काही आस्थापनांमध्ये लहान मुले बालकामगार म्हणून काम करीत असल्याची विश्वसनीय माहिती गोपनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. त्यानंतर मिळालेल्या माहितीची शहानिशा केल्यावर कारवाई करण्याचे ठरवण्यात आले.
अल्पवयीन बालकांची बालमजूरीतून मुक्तता : 17 फेब्रुवारीला विशेष बाल पोलीस कक्ष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार कदम आणि पोलीस पथकाने प्रथम या स्वंयसेवी संस्थेचे मदतीने साडेपाच वाजताच्या सुमारास देसाई व कदम चाळ, पोटमाळा, बाणडोंगरी, अशोक नगर, हनुमान मंदिर जवळ, कांदिवली पूर्व येथील शुभंकर मंडल यांचा इमिटेशन ज्वेलरीचा कारखाना, देसाई व कदम चाळ, पोटमाळा, बाणडोंगरी अशोकनगर, हनुमान मंदिर जवळ, कांदिवली पूर्व येथे छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत आस्थापनेमधून इमिटेशन ज्वेलरी कानातील रिंगला डायमंड लावण्याचे काम करीत असलेल्या एकूण पाच अल्पवयीन बालकांची बालमजूरीतून मुक्तता करण्यात आली आहे.
ज्वेलरीच्या मालकाविरोधात कारवाई : या कारवाईत इमिटेशन ज्वेलरीच्या मालकास ताब्यात घेण्यात आले आहे. मालकाचे नाव शुभंकर मोरारी मंडल, (वय ३६ वर्षे)असून तो मालाड पूर्व येथील कुरार व्हिलेज परिसरातील उषा सदन चाळीत राहतो. समतानगर पोलीस ठाण्यात इमिटेशन ज्वेलरीच्या मालकाविरोधात कलम ७५, ७९ बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बालमजुरी कायद्याने गुन्हा आहे.