नागपूर - राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आल्याची माहिती पुढे आल्यानंतर वडेट्टीवार यांनी स्वतः पुढे येऊन या बातमीचे खंडन केले आहे. या संदर्भात पुढे आलेली माहिती निराधार असल्याचे ते म्हणाले.
आजच्या तारखेत माझ्यावर एकही गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल नसून माझ्या बदनामीचा विरोधक प्रयत्न करीत असल्याचा आरोप मंत्री विजय वडेट्टीवारांनी केला. परवाना जप्त केल्याची बातमी समोर आल्यावर तो जप्त केला नसून त्यांनी स्वतः सक्तवसुली संचलनालय (ईडी) कार्यालयात २१ डिसेंबरला जमा केल्याची माहिती वडेट्टीवारांनी दिली. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत वडेट्टीवर म्हणाले कि, २०१२ साली त्यांनी परवाना काढला होता. त्यावेळी त्यांच्यावर किरकोळ स्वरुपाचे चार गुन्हे दाखल होते. परंतु, परवाना काढताना प्रतिज्ञापत्र द्यावे लागत नसल्याने या गुन्ह्याविषयीची माहिती त्यांनी दिली नाही. आता भाजप आमदार भांगडिया यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यावर नोटीस आली आणि नोटीसीचेही त्यांनी उत्तर दिले आहे. पोलिसांच्या विशेष शाखेकडून त्यांच्यावर आता कुठलाही गुन्हा दाखल नसल्याचे प्रमाणपत्र देखील त्यांच्याकडे उपलब्ध आहे.
हा तर माझ्या बदनामीचा प्रयत्न - वडेट्टीवार
गेल्या २५ वर्षांपासून मी सक्रिय राजकारणात आहे. विविध पदांवर काम करताना मी करत असलेली जनसेवा माझ्या विरोधकांच्या डोळ्यात खुपत असल्याचा आरोप करताना त्यांनी कुणाचेही नाव घेतले नाही. विरोधक केवळ सुतळीचा साप करीत असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी यावेळी केला. मी समोर जाऊ नये व माझी बदनामी करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी यावेळी केला.