नागपूर- शहराबरोबर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. कोरोना संकट काळात प्रशासनाचा बेजबाबदारपणा समोर आणणाऱ्या अनेक घटना घडल्या आहेत. हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी नगरपरिषदेचे एक प्रकरण उघडकीस आले आहे. प्रशासनाकडून लक्षणे नसलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना घरीच ठेवण्याचे आवाहन केले गेले. मात्र, रुग्णाला घरी कसे ठेवावे, त्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत काही सागण्यात आले नाही. रुग्णाची तब्येत बिघडताच रुग्णाला घरी ठेवायला कोणी सांगितले, अशी विचारणा पालिकेकडून करण्यात आली. पालिका प्रशासनाने रुग्णाच्या कुटुंबियांनाच धारेवर धरले.
हिंगणा तालुक्यात वानाडोंगरी नगर परिषदेचे एक प्रकरण नुकतेच समोर आले आहे. कोरोना बाधित रुग्णाच्या कुटुंबियांना पहिल्या दिवशी रुग्ण घरीच ठेवा असे सांगणारी नगर परिषद दुसऱ्या दिवशी रुग्णाची तब्येत बिघडल्यावर तुम्ही रुग्णाला घरी का ठेवले?, रुग्णालयात का दाखल केले नाही? असे प्रश्न विचारत आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत असल्याचे रुग्णाच्या कुटुंबियांनी सांगितले.
हेही वाचा-नागपूर: शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा लाईन अद्याप नादुरुस्त, रुग्णांना मेयोत हलवले
रुग्णाच्या कुटुंबियांनी या सर्व प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत रुग्णांच्या कुटुंबियांना योग्य मार्गदर्शन का केले जात नाही, असा सवाल विचारला आहे. रुग्ण कोरोनाबाधित आल्यानंतर ही नगर परिषदेकडून घरी मार्गदर्शन करायला आले नाही. घर आणि परिसर सॅनिटाईझ करायला ही कोणीच येत नसल्याचे याप्रकरणामुळे समोर आले आहे. नगर परिषदेकडून रुग्णांचे चाचणी अहवाल उशिरा दिले जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर ही त्याबद्दलची माहिती तोंडी सांगून घरी पाठवले जात असल्याचे आरोप नागरिकांनी केले आहे. शहरी भागात धुमाकूळ माजवणारा कोरोना आता ग्रामीण भागात दाखल होत असताना तिथल्या प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.