नागपूर - जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी रश्मी बर्वे, तर उपाध्यक्षपदी मनोहर कुंभारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत 58 पैकी तब्बल 30 जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते. त्यामुळे नागपूर जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकला आहे.
नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे अनुसूचीत जाती महिला राखीव आहे. या प्रवर्गातून काँग्रेसच्या चार महिला निवडून आल्या आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडेल याची उत्सुकता सर्वांना लागली होती. अशात रश्मी बर्वे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने एकत्र नागपूर जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती. यामध्ये काँग्रेस 30, तर राष्ट्रवादीचे उमेदवार 10 जागांवर विजयी झाले. त्यामुळे उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावे, अशी राष्ट्रवादीची इच्छा होती. मात्र, काँग्रेसने दोन्ही पदे त्यांच्याकडेच ठेवल्याने राष्ट्रवादीमध्ये नाराजी दिसून आली. काँग्रेसने आघाडी धर्म पाळला नाही, असेही काँग्रेसवर राष्ट्रवादीतर्फे आरोप करण्यात आले. मात्र, 2 पंचायत समित्यांचे सभापतिपदी राष्ट्रवादीला मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे आणि उपाध्यक्ष मनोहर कुंभारे हे राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार गटाचे आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेवर सुनील केदार गटाचे निर्विवाद वर्चस्व स्थापन झाले आहे.
पक्षीय बलाबल -
- जिल्हा परिषद एकूण जागा - 58
- काँग्रेस - 30
- राष्ट्रवादी - 10
- भाजप - 15
- शिवसेना -01
- अपक्ष - 01
- शेकाप - 01