नागपूर :'सत्य परेशान हो सकता है लेकिन पराभूत नही हा महात्मा गांधींचा संदेश', मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 35 वर्षानंतर भ्रष्टाचारातून निर्दोष सुटका केलेल्या निर्णयातून हे स्पष्ट होते. वेस्टर्न कोल लिमिटेडचे तत्कालीन माजी मुख्य व्यवस्थापकीय संचालक यांना भ्रष्टाचार प्रकरणातून मुक्त केले. या प्रकरणात रामधीरज रॉय ( Ramdhiraj Roy ) यांना वयाच्या 76 व्या वर्षी अर्धे आयुष्य कोर्टात लढा देण्यात गेल्यानंतर दिलासा मिळाला.
वेकोलीकडून सन 1987 मध्ये कामठी भागात 25 खाटांचे रुग्णालय बांधकामासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. हे कंत्राट एका खासगी कंपनीला देण्यात आले होते. त्यानंतर मात्र अचानक कंत्राटदार बदलवण्यात आला. यात हे कंत्राट इंडस इंजिनिअरिंग कंपनीला देण्यात आले. यावरून भ्रष्टाचार झाल्याच्या कारणावरून वेकोलिचे माजी मुख्य व्यवस्थापकीय संचालक ( Former Chief Managing Director of Vecoli ) रामधीरज रॉय आणि कंत्राटदार कंपनीचे मालक यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून सुरू झालेला हा लढा वर्षोनुवर्ष असाच सुरू राहिला. यामध्ये तत्कालीन वेकोलिच्या मुख्य वित्त व लेखा अधिकारी डी जनार्दन राव यांच्या साक्ष दिली आहे. यावरुन तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक रामधीरज रॉय यांनी कंत्राट इंडस इंजिनिअरिंग कंपनीला देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप केला होता. त्यामुळे भ्रष्टाचार केला म्हणून दोषारोप ठेवण्यात आले होते.
या प्रकरणात रामधीरज रॉय यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ( Nagpur Bench of Mumbai High Court ) त्यांच्यावर असलेला गुन्हा रद्द करण्यासाठी त्यांचे वकील गुप्ता यांच्यामार्फत याचिका दाखल केली. यामध्ये वेकोलिचे वित्त व लेखा अधिकारी हे राष्ट्रपती मार्फत नियुक्त असतात. त्यांच्यावर वेकोलिच्या व्यवस्थापकीय संचालकाचा कुठलही नियंत्रण नसते. त्यामुळे कंत्राटदाराच्या संदर्भात पूर्ण अधिकार डी जनार्दन राव यांच्याकडे होते. त्यामुळे त्यांनी केलेले आरोप हे बिनबुडाचे असून कुठलेही सबळ पुरावे त्यांच्याकडे नसल्याच्या युक्तिवाद करण्यात आला. यावर मुग्धा चांदूरकर यांनी सरकारी पक्षातर्फे बाजू मांडली. तर याप्रकरणी दोन्ही पक्षांची बाजू ऐकून रामधीरज रॉय यांच्यावरील गुन्हा त्वरित रद्द करत त्यांची निर्दोष सुटका केली.