नागपूर - विदर्भात यावर्षी सरासरी १०६ टक्के पावसाचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने पावसाळा सुरू होण्याच्या काही दिवस आधी वर्तवला होता. मात्र यावर्षी पावसाळ्याच्या हंगामातील जुलै आणि ऑगस्ट महिने बऱ्यापैकी कोरडे गेल्यामुळे विदर्भात पावसाची सरासरी उणे १४ टक्यांवर आली आहे. प्रादेशिक हवामान विभागाने उद्यापासून नागपूरसह विदर्भात पावसाचे पुनरागमन होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होईल असा देखील अंदाज व्यक्त करण्यात आला असून पावसाळा लांबण्यामागे वातावरणाचा पॅटन बदलाचे संकेत असल्याचं देखील ते म्हणाले आहेत.
पावसाची टक्केवारी घटली -
अकोला जिल्ह्यात - १६ टक्के, अमरावती -२८ टक्के, बुलढाणा उणे २० टक्के, भंडारा उणे १६ टक्के, गडचिरोली -२५% आणि गोंदियात -२४ टक्के तर कमी झालेली पावसाची नोंद झाली आहे. या विदर्भातील अकरा पैकी सहा जिल्ह्यात पावसाची कमी झालेली टक्केवारी धोक्याचा इशारा देत आहे. पावसाअभावी विदर्भातील नदी, तलाव आणि जलाशये अजूनही समाधानकारकरित्या भरले नसल्याने पुढील उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागेल अशी देखील भीती व्यक्त होत आहे.
उद्यापासून पावसाचे पुनरागमन -
प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक मनमोहन साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे ५, ६ आणि ७ सप्टेंबरला दमदार पावसाचा अंदाज आहे. ज्यामुळे काही जिल्ह्यातील पावसाची उणे झालेली टक्केवारी कमी होईल.
वातावरणाचा पॅटन बदलाचे संकेत -
गेल्या वर्षांपासून एक बाब लक्षात आली आहे की निर्धारित वेळेच्या नंतर मानसून विदर्भात दाखल होतो आणि निर्धारित वेळेच्या पुढे देखील बरसतो, त्यामुळे पावसाळा लांबल्याच आपल्याला बघायला मिळतं. हे वातावरणाचा पॅटन बदलाचे संकेत असल्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाचे संचालक साहू यांनी सांगितले आहे. बऱ्याच वर्षानंतर यावर्षी विदर्भात वेळे आधी दाखल झाला मात्र त्यानंतर अधून मधून पाऊसाची नोंद झाली असली तरी पावसाची पावसाची टक्केवारी मात्र उणे आहे.