नागपूर : 16 एप्रिलला महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा नागपुरात होणार आहे. यानंतर अवघ्या काही दिवसात म्हणजे 20 ते 25 एप्रिल दरम्यान राहुल गांधी आणि प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांची एक मोठी सभा नागपुरात घेण्याचे नियोजन असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली होती. काल (सोमवारी) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीची एक बैठक ठाण्यात बोलावण्यात होती. त्यात नागपूर येथे कॉंग्रेस नेते राहुल गांधीची जाहीर सभा आयोजित करून 2024 लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात येईल, यावर शिक्कामोर्तब झाले आल्याची माहिती आहे. देशात मोदी सरकारने जी काही स्थिती निर्माण केली आहे, त्याची खरी वस्तुस्थिती जनतेपर्यंत पोचवण्यासाठी ही सभा घेतली जाणार असल्याचे देखील नाना पटोले म्हणाले आहेत.
राहुल गांधींची वेगळी सभा का? विदर्भ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मात्र, गेल्या काही वर्षांचा मागोवा घेतला तर विदर्भात भाजपचा जनाधार वाढला आहे. त्यातच २०१९ नंतर राजकीय परिस्थिती पुन्हा बदलली आहे. ज्या विदर्भात काँग्रेस पक्ष अस्तित्वाची लढाई लढत होता, तोच विदर्भ काँग्रेसच्या पाठीमागे उभा राहताना दिसत आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा काँग्रेसला विदर्भातून अनपेक्षित यश मिळाल्यानंतर अनेक दशके भाजपच्या ताब्यात असलेली नागपूर पदवीधर निवडणूक काँग्रेसने जिंकली. गेल्याच महिन्यात झालेल्या नागपूर विभाग शिक्षक आणि अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय झाला होता. त्यामुळे काँग्रेस पक्षाला विदर्भातूनच नवसंजीवनी मिळेल अशी आशा काँग्रेस पक्षश्रेष्ठींना आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या सभेसाठी नागपूरची निवड केली असल्याचे बोलले जात आहे.
'भारत जोडो'ला विदर्भातून जोरदार प्रतिसाद: काही महिन्यांपूर्वीच राहुल गांधी यांची 'भारत जोडो' यात्रेने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातून प्रवास केला होता. त्यावेळी काँग्रेस पक्षासाठी बालेकिल्ला राहिलेल्या विदर्भातून चांगला प्रतिसाद मिळाला होता.
संघ भूमीतून राहुलची ललकार: राजकारणात सक्रिय झाल्यापासून राहुल गांधी सातत्याने भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करत राहिले आहे. थेट संघ भूमीतूनच संघ आणि भाजपवर टीका केल्यास त्याचा परिणाम दूरगामी होईल, असा देखील अंदाज काँग्रेसकडून बांधण्यात आला आहे.