नागपूर : गेल्या अनेक दिवसापासून तुकाराम मुंढे यांच्या बदलीबाबत चर्चा सुरू होती. मुंढे यांच्या बदलीनंतर आता नागपूर महानगरपालिकेचे नवे आयुक्त म्हणून राधाकृष्णन बी. यांनी आज(शुक्रवार) पदभार स्वीकारला. शिवाय यापूर्वी आयुक्त राधाकृष्णन यांनी मुंढेंसोबत फोनवरून चर्चा करत पदभार घेतला होता. त्यानंतर आज नागपूर महानगरपालिकेत प्रत्यक्ष पदभार स्वीकारला. शिवाय कोरोना नियंत्रण हेच ध्येय असेल असेही आयुक्त राधाकृष्णन यांनी सांगितले.
बहूचर्चित नागपूर महानगरपालिकेतून तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नवे मनपा आयुक्त म्हणून राधाकृष्णन बी. यांची वर्णी लागली आहे. याच पार्श्वभूमीवर मनपाचे नवे आयुक्त म्हणून राधाकृष्णन बी. यांनी आज पदभार स्वीकारला. तुकाराम मुंढे यांच्या बदली व कार्यबाबत सर्वत्र चर्चा सुरू होत्या. तर, आता महानगरपालिकेत नवे आयुक्त आल्यानंतर त्यांचे कार्य कसे असतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, नवे आयुक्त राधाकृष्णन यांनी, कोरोना नियंत्रण हाच मुख्य उद्देश असून त्यासाठी प्रशासकीय अधिकारी म्हणून पूर्ण ताकदीने काम करणार असल्याचे माध्यमांशी बोलतांना सांगितले. शिवाय आज संपूर्ण कोरोना स्थितीबाबत आढावा घेत, माहीती घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर महानगरपालिका व प्रशासनाला कोरोना परिस्थितीला नियंत्रणात नागरिकांनीदेखील सहकार्य करावे, असेही आयुक्त राधाकृष्णन म्हणाले.
नागपूर महानगरपालिकेत याच दिवशी म्हणजेच २८ जानेवारीला तुकाराम मुंढे यांनी आयुक्त पदभार स्वीकारला होता. त्यानंतर महानगरपालिकेतील कामकाजाला देखील शिस्त लागल्याचे पहायला मिळाले. मात्र, मुंढे आयुक्त पदावरून जाताच महानगरपालिकेतील शिस्त काहीशी बिघडल्याचे देखील पहायला मिळत आहे. त्यामुळे नवे आयुक्त म्हणून राधाकृष्णन बी. महानगरपालिकेत कोणते नवीन नियम लावणार हे पाहणे देखील महत्वपूर्ण ठरणार आहे. शिवाय आयुक्त राधाकृष्णन कोरोनाबाबत कोणत्या उपाययोजना करणार आहेत, याचे देखील नागपूरकरांना औत्सुक्य लागले आहे. असे असले तरी पदभार स्वीकारल्यानंतर आयुक्त राधाकृष्णन यांनी नागपूरकरांनी सहकार्य करावे असे आवाहनही केले आहे.
हेही वाचा - नागपूर मेट्रोच्या 'या' स्टेशन दरम्यान १० किमी ट्रॅकसह, ८७ टक्के व्हायाडक्टचे कार्य पूर्ण