नागपूर - हिंगणा तालुक्यातील वानाडोंगरी येथे तयार करण्यात आलेले विलगीकरण केंद्र तेथून हलवण्याची मागणी जिल्हा प्रशासनाने मंजूर केली आहे. विलगीकरण केंद्र तेथून हलवण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आग्रही होते.
याविषयी हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांनी शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन विलगीकरण केंद्र हटवण्याची मागणी केली होती. एववढेच नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार मेघे यांनी ठिय्या आंदोलनही केले. विलगीकरण केंद्र इतरत्र हलवण्यात येत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहण्याचा पवित्रा आमदार मेघे यांनी घेतला, ज्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी वानाडोंगरी येथील विलगीकरण केंद्र इतर ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेतला.
नागपूर शहरात कोरोनासाठी 'हॉटस्पॉट' ठरलेल्या सतरंजीपुरा येथील सुमारे सव्वाशे संशयितांना इथे ठेवण्यात आले होते. ज्या परिसरातून मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत त्या परिसरातील संशयित नागरिकांना ठेवल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सोबतच वानाडोंगरीमध्ये एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नाही, या संशयित व्यक्तींमुळे तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली होती. अखेर जिल्हा प्रशासनाने नागरिकांची मागणी लक्षात घेऊन शुक्रवारी संध्याकाळी विलगीकरण केंद्र रिकामे करण्यास सुरुवात केली.