नागपूर- राज्यातील पूर परिस्थिती अत्यंत गंभीर आणि भीषण आहे. मात्र, या पूर परिस्थितीबाबत सरकार असंवेदनशीलपणे वागत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. शहरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यात पूर परिस्थिती गंभीर असताना मुख्यमंत्री निवडणूक प्रचारासाठी यात्रेत व्यस्त असल्याची टीका वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. शासनाने पूरग्रस्त लोकांना कुठलीही मदत दिली नसल्याचे देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. पूरग्रस्तांना ताबडतोब मदत निधी देण्यात येते. मात्र, तो अजूनही लोकांना देण्यात आलेली नाही. आमदार, मंत्री पूरग्रस्त भागात भेटी देत असल्याने प्रशासन त्यांच्यामागे फिरतेय. परंतू पूरग्रस्तांना मदत मिळत नाही. मंत्री सेल्फी काढण्यात व्यस्त आहेत असे मत वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले ते नागपुरात बोलत होते.
अडीच लाखांच्यावर नागरिक पुरात अडकले आहेत. भाजपकडे निवडणूक प्रचाराच्या कामासाठी पैसे आहेत. मात्र, दुष्काळग्रस्त भागाला मदतीसाठी निधी नाही, असा आरोप देखील त्यांनी केला. कोल्हापूर, सांगली, सातारा येथील नद्यांमधील पाणी कर्नाटकच्या अलमट्टी धरणात अडवले जाते, धरणात पाणी अडवल्याने या भागात पूरस्थिती निर्माण होते. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्यस्तरीय समन्वय समिती तयार करण्यात यावी, अशी मागणी सुद्धा आंबेडकर यांनी केली.