नागपूर - कोरोनामुळे राज्यातील सर्वच महाविद्यालयांच्या शैक्षणिक प्रक्रियेवर परिणाम झाला. त्यामुळे, संसर्गाचा धोका लक्षात घेता ऑनलाइन परीक्षा घेण्यात आल्या. मात्र, ही सगळी प्रक्रिया पूर्ण करताना विद्यापीठांना मोठी कसरत करावी लागली. नुकतेच विविध पदवीचे निकाल जाहीर झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर नागपूर विद्यापीठाची रखडलेली पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया ५ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. यात विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा समावेश असून, ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.
कोरोनामुळे सगळ्याच परीक्षा ऑनलाइन घेण्यात आल्या. त्यामुळे, सर्वच विद्यापीठांना निकाल जाहीर करण्यास उशीर झाला. याचा परिणाम पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेवर झाला. दरवर्षी पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया ही ठरावीक कालावधीत राबवल्या जाते. परंतु, यंदा त्यात उशीर झाला. असे असले तरी 'देर आये दुरुस्त आये' म्हणत नागपूर विद्यापीठाकडून ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे.
प्रवेश प्रक्रिया दोन फेऱ्यांमध्ये होणार
ही प्रक्रिया दोन फेऱ्यांमध्ये होणार असून पहिल्या फेरीसाठीचे नियोजन विद्यापीठाकडून पूर्ण करण्यात आले आहे. पहिल्या फेरीत एमएससी, एम.कॉम, एलएलएम, एमसीटी, एमआयआरपीएम या प्रमुख अभ्यासक्रमांचा समावेश असणार आहे. शिवाय याकरिता विद्यार्थांना ५ डिसेंबर ते १२ डिसेंबर पर्यत अर्ज भरता येणार असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे, विद्यार्थीही या प्रवेश प्रक्रियेसाठी सज्ज असल्याचे पाहायला मिळत आहे.
पहिल्या फेरीत चूरस निर्माण होण्याची शक्यता
दरवर्षी पहिल्या फेरीतून निवडलेल्या विद्यार्थांना टक्केवारीनुसार महाविद्यालय निवडण्याची सुट असते. परंतु, यंदा सगळ्याच विद्यार्थ्यांची टक्केवारी समान असल्याने पहिल्या फेरीत मोठी चूरस निर्माण होण्याची शक्यता आहे.
पहिल्या फेरीचा वेळापत्रक पुढील प्रमाणे -
५ ते १२ डिसेंबर - ऑनलाइन अर्ज दाखल करणे
१६ डिसेंबर - तात्पुरती गुणवत्ता यादी लागेल
१६ ते १८ डिसेंबर - काही त्रुटी किंवा आक्षेप असल्यास कळवता येईल
२० डिसेंबर - अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल ( दुपारी ३ पर्यत )
२१ ते २२ डिसेंबर - पहिल्या फेरीसाठी पसंती क्रम देणे
२५ डिसेंबर - महाविद्यालयीन जागांची वाटप यादी
२६ ते ३० डिसेंबर - विद्यार्थ्याने महाविद्यालयाला हजर राहाणे
३० डिसेंबर - पहिल्या यादीतील रिक्त जागा जाहीर होणार
३० डिसेंबर ते १ जानेवारी - दुसऱ्या फेरीसाठी पसंती क्रम ठरवणे
३ जानेवारी - जागांची वाटप यादी जाहीर होणार
४ ते ८ जानेवारी - विद्यार्थांनी महाविद्यालयाला हजर राहाणे
१४ जानेवारी - शैक्षणिक वर्गांना सुरुवात होणार
असे असले तरी पदव्युत्तर अभ्यासक्रमात एम.ए, एमएफए यासह व्यवस्थापन विभागातील अभ्यासक्रमांसाठी दुसऱ्या टप्प्याच्या तारखा अद्यापही जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे, या अभ्यासक्रमांचे काय? असा प्रश्न विद्यार्थांकडून उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा - नागपूर पदवीधर निवडणूक : प्रमुख नेत्यांसह उमेदवारांनीही बजावला मतदानाचा हक्क