नागपूर- शहरातील जरीपटका भागात एका पोलीस अधिकाऱ्याने एका गरीब महिलेचा भाजीपाला भर रसत्यात फेकल्याची घटना घडली होती. या संतापजनक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायलर झाला आहे. संतोष खांडेकर असे त्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिसाद उमटत आहेत. त्यामुळे घटनेचे गांर्भीय लक्षात घेता खांडेकर यांची चौकशी सुरू असून त्यांच्यावर आजच (शनिवार) कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
घटनेवर नागपूर पोलिसांचे ट्विट
नागपूर पोलीस प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात नागपूर पोलिसांच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आले आहे. ज्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक संतोष खांडेकर यांच्या अमानवीय व्यवहारावर खेद व्यक्त करण्यात आला असून त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. एवढचं नाही तर पोलिसांनी आपले कर्तव्य बजावताना मानवीय दृष्टिकोन बाळगूनच कार्य करावे, असा सल्लादेखील देण्यात आला आहे.
काय आहे घटना
शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असलेल्या रोडच्या कडेला एक गरीब महिलेने भाजीचे दुकान लावले होते. अकरा वाजल्यानंतर देखील महिलेने दुकान बंद न केल्याने संतापलेले पोलीस उपनिरीक्षक संतोष खांडेकर यांनी त्या वृद्ध महिलेनी विकण्यासाठी आणलेली संपूर्ण भाजी रस्त्यावर फेकून दिली. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर वायरल झाला.