नागपूर - जिल्ह्यातील मौदा तालुक्याच्या मारोडी येथील बलात्कार पीडितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बलात्कार पीडितेने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली असून त्यामध्ये तिने आरोपी मयूरला फाशी देण्याची मागणी केली आहे.
मौदा तालुक्यातील मारोडी येथील बस स्थानकावर ४ दिवसांपूर्वी आरोपी मयूर याने पीडितेवर बलात्कार केला होता. या घटनेची तक्रार मौदा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली. पोलिसांनी त्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच पीडितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
पीडितेने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. त्या सुसाईट नोटमध्ये तिने मुख्य आरोपी मयूरला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तसेच या घटनेतील अन्य आरोपी श्याम राहुल आणि एका अल्पवयीन आरोपीला सोडून देण्याची विनंती तिने सुसाईट नोटच्या माध्यमातून केलेली आहे.