नागपूर - मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या ऑरेंज आणि अॅक्वालाईन येथे दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरू आहे. मोठ्या प्रमाणात नागरिक याचा वापर करत आहे. आता प्रवाशांना मेट्रोत प्रवास करताना सोबत स्वतःची किंवा फिडर सर्विस येथील सायकल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत नेण्याचीही परवानगी देण्यात आली आहे.
आज काही प्रवशांनी सुभाष नगर मेट्रो स्टेशन येथून लोकमान्य नगर स्टेशन दरम्यान सायकल सोबत प्रवास केला. या प्रवाशांनी लिफ्टच्या सहाय्याने काँनकोर्स येथे प्रवेश केला. पुन्हा लिफ्टच्या सहाय्याने प्लॅटफार्मला पोहचून मेट्रो ट्रेनमध्ये सायकल सोबत इच्छित स्थानकापर्यंत प्रवास पूर्ण केला. या अनोख्या प्रयोगामुळे प्रवासी आता कुठल्याही ठिकाणी जाण्यासाठी सहजपणे मेट्रोमध्ये सायकल सोबत बाळगून प्रवास करू शकतात. त्यामुळे आता मेट्रो सोबत सायकल अशी पर्यावरणपूरक प्रवासी सेवा नागरिकांच्या फायद्याची ठरणार आहे.
जिमला सायकलने जाणाऱ्यांची झाली सोय -
मेट्रोने सुरू केलेल्या सेवेमुळे सायकलीस्ट, जिम करणाऱ्या व्यक्ती आणि कामगार अगदी आरामात आपली सायकल हव्या त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे सायकलिंगच्या मोहिमेला हातभार लागणार असून शहरातील प्रदूषण देखील कमी होण्यास मदत होणार आहे.