नागपूर- पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या ५ ही जिल्ह्यात पुराने थैमान घातले आहे. मध्यप्रदेश येथील चौराई आणि संजय सरोवर धरणातून पाण्याच्या विसर्ग करण्यात आल्याने ही पूर परिस्थिती ओढवली आहे. विदर्भातील चार जिल्ह्यात पुराची परिस्थिती कशी आहे, हे पुढील अहवालातून समजून येईल.
राज्याची उपराजधानी नागपूर जिल्ह्यातील उमरेड, कुही, पारशिवणी आणि मौदा तालुक्याला पुराचा जोरदार फटका बसला आहे. मध्यप्रदेश येथील चौराई धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्याने पेंच आणि तोतलाडोह जलाशयातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. ज्यामुळे १९९४ नंतरचा सर्वात मोठा पूर नागपूर जिल्ह्याने अनुभवला आहे.
एनडीआरएफने ३६ गावांमधील १४ हजार २३४ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. तर सुमारे २८ हजार नागरिकांना शेलटर होममध्ये हलवण्यात आले आहे. पारशिवणी तालुक्यातील पेंच नदीवर दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूलसुद्धा पुराने वाहून गेला आहे. मध्यप्रदेश येथे अजूनही पाऊस सुरूच राहिला तर नागपूर जिल्ह्याला पुराचा धोका कायम आहे. नागपूर जिल्ह्यातील १७ हजार हेक्टर शेती पुरामुळे खराब झालेली आहे.
गडचिरोली- भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे पाणी सोडल्याने गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पेक्षाही मोठी पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद आहेत. शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. तसेच अनेकांच्या घरात पाणी शिरले. ६०० व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. गोसेखुर्द धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच ३० हजार ५०० क्युमेक्स पाणी सोडण्यात आले आहे. गोसेखुर्दच्या आजपर्यंतच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा विसर्ग आहे. गोसेखुर्द धरणातून २४ ऑगस्ट २०१३ ला १६ हजार ६२५ क्युमेक्स, तर ९ सप्टेंबर २०१९ रोजी १३ हजार ७३९ क्युमेक्स पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर आता सर्वाधिक पाणी सोडण्यात आले. परिणामी गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा तसेच अनेक उपनद्या व नाले फुगले असून, पाणी रस्त्यावर आले आहे.
रविवारी पहाटेपासून गडचिरोली-आरमोरी, गडचिरोली-चामोर्शी, आरमोरी-रामाळा, देसाईगंज-लाखांदूर, आष्टी-गोंडपिपरी, आरमोरी-ब्रम्हपुरी मार्ग बंद आहेत. देसाईगंज तालुक्यातील सावंगी, धरमपुरी येथील ३६० व आरमोरी तालुक्यातील चुरमुरा गावातील २४ व्यक्तींना, वाघाडा येथील सुमारे २०० व्यक्तींना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविले आहे. तर कोटगल ब्यारेज बांधकाम स्थळी अडकलेल्या २३ कामगारांना रेस्क्यू करून वाचविण्यात आले आहे. पुरामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पूर ओसरताच नुकसानग्रस्त भागाचे सर्व्हेक्षण करून शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत.
भंडारा- जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून एक थेंबही पाऊस पडलेला नसतानाही जिल्हा पाणी पाणी झाला आहे. मध्य प्रदेश येथील संजय सरोवर धरणाचे पाणी सोडल्याने भंडारा जिल्ह्यत पूर परिस्थिती निर्माण झाली. शनिवारी आलेला पूर सोमवारीही कायम आहे. काल पासून जिल्ह्यातील विविध भागात एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या पथकाच्या माध्यमातून फसलेल्या लोकांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहे. आता पर्यंत पुरामुळे जिल्ह्यातील ५८ गावातील २ हजार ६४६ कुटुंब पूर बाधित झाले आहेत. या मध्ये भंडारा तालुक्यातील २३ गावातील १ हजार ७९० कुटुंब, पवनी तालुक्यातील २२ गावातील ५०५, तुमसर तालुक्यातील ५ गावातील १२७, मोहाडी तालुक्यातील ६ गावातील १६७ व लाखांदूर तालुक्यातील २ गावातील ५७ कुटुंब असे एकूण ५८ गावातील २ हजार ६४६ कुटुंब बाधित झाले आहेत.
भंडारा जिल्ह्यतील १ हजार ९९४ नंतरचा हा सर्वात मोठा पूर आहे, पुरामुळे भंडारा तालुक्याच्या ग्रामीण भागात शहराच्या सभोवताल, पवनी तालुक्यातील नदी काठावरील ग्रामीण भागात, लाखांदूर तालुक्यातील नदीकाठावरील गावात तसेच तुमसर आणि मोहाडी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या तिरावरील गावांमध्ये पूर आले आहे.
संजय सरोवरचे पाणी थांबलेले असून गोसे धरणातील १३ दरवाजे ५ मीटर ने तर २० दरवाजे हे साडेचार मीटरने उघडण्यात आले असून या मधून ३० हजार ११६ क्युमेक पाण्याच्या विसर्ग होत आहे. त्यामुळे पवनी आणि गडचिरोली जिल्ह्यातील नदी काठावरील गावांना पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते.
गोंदिया- जिल्ह्यात २८ आणि २९ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीने पूरपरिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता. पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने गोंदिया तालुक्यातील २० आणि तिरोडा तालुक्यातील १० गावातील १ हजार २८२ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. पुराचे पाणी आता ओसरू लागल्याने जनजीवन पूर्वपदावर येत आहे. २८ ऑगस्टला ७७.१६ मिलीमीटर आणि २९ ऑगस्टला ७६.४९ मिलीमीटर असा सरासरी पाऊस झाल्याने दोन्ही दिवस अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे जिल्ह्यातील नदी-नाले पाण्याने तुडुंब भरून वाहू लागले. जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग याच काळात करण्यात आल्याने पूर परिस्थिती आणखी बिकट झाली होती.
पूरपरिस्थितीच्या या काळात मदत व बचाव कार्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे व पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनात महसूल आणि पोलीस यंत्रणा कामाला लागली. सुरक्षेच्या कारणास्तव गोंदिया तालुक्यातील बनाथर येथील १९, कटंगटोला येथील २, वडेगाव, तेढवा, डांगुर्ली, किन्ही, मरारटोला, पुजारीटोला येथील ८७, कासा, बिर्सोला येथील ३०, आंबाटोला येथील ३०, जिरूटोला येथील २, भद्याटोला येथील २, महालगाव व मुरदाडा येथील १६६, मुर्दाळा येथील ४८, सायटोला येथील ३२, धापेवाडा, लोढीटोला आणि देवरी येथील २५ नागरिकांना, तर तिरोडा तालुक्यातील ढिवरटोला येथील ९६ नागरिकांना हलविण्यात आले.
जिल्ह्यात सद्यस्थितीत गोंदिया तालुक्यातील पुजारीटोला, कासा, ब्राह्मणटोला, महालगाव, मुरदाडा, धापेवाडा आणि लोधीटोला, तर तिरोडा तालुक्यातील ढिवरटोला, चांदोली, घाटकुरोडा, बिरोली आणि सावरा गावांचा संपर्क अद्यापही तुटलेला आहे. ज्या गावातील लोकांना पुरातून बाहेर काढण्यात आले आहे, त्या नागरिकांची संख्या १३६ आहे. गोंदिया तालुक्यातील जिरूटोला येथील ८, भदयाटोला येथील २, मरारटोला येथील ३२ आणि तिरोडा तालुक्यातील ढिवरटोला येथील ९६ लोकांचा समावेश आहे.
हेही वाचा- नागपूर जिल्ह्यात पूर परिस्थिती कायम, एसडीआरएफने १४ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले