नागपूर - शहरातील छावणी परिसरात असलेल्या व्हीनस रूग्णालयात रविवारी दुपारी एका महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रूग्णलायत घुसून तोडफोड केली. रूग्णालयातील वीज गेल्याने ऑक्सिजन बंद पडले व त्यामुळेच महिलेचा मृत्यू झाला, असा आरोप महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे.
काय आहे प्रकरण -
तीन दिवसांपूर्वी जरीपटका परिसरात राहणाऱ्या एका महिलेची कोरोनामुळे प्रकृती बिघडली. कुटुंबियांनी तिला छावणी येथील व्हीनस क्रिटिकल केअर रूग्णालयात दाखल कले. महिलेची प्रकृती सुधारेल असे सांगण्यात आले. पण, रात्री उशिरा महिलेच्या कुटुंबियांना ऑक्सिजन सिलेंडर आणून देण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, रूग्णालयातील विद्युत पुरवठा खंडित झाला. त्यावेळी रूग्णालय प्रशासनाने जनरेटर चालू केले नाही. ऑक्सिजनचा पुरवठा खंडित होऊन महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
नातेवाईकांनी केली रूग्णालयात तोडफोड -
महिलेच्या मृत्यूमुळे रूग्णालय परिसरातील वातावरण तणावपूर्ण झाले. महिलेच्या नातेवाईकांनी रूग्णालयामध्ये अक्षरशः दगड फेककरून तोडफोड केली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकारामध्ये रूग्णालयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रूग्णालय प्रशासनाच्यावतीने सदर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहून पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.