नागपूर - विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे मंगळवारी(24 डिसेंबर) एक दिवसीय आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. वेगळे विदर्भ राज्य देण्यात यावे आणि विजेचे दर कमी करावे, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात हे आंदोलन करण्यात आल्याची माहिती आंदोलकांनी दिली आहे.
वेगळ्या राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती गेल्या अनेक वर्षांपासून लढा देत आहे. मात्र, यश मिळत नसल्याने आता 'मिशन 2023'चे लक्ष डोळ्यासमोर ठेऊन या समितीने एक अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. या अॅक्शन प्लॅनचा एक भाग म्हणून आज हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, आंदोलनात केवळ बोटावर मोजण्याइतकेच आंदोलक सहभागी झाल्याने आंदोलनाच्या आयोजनावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात छत्तीसगड, झारखंड आणि उत्तरांचल या तीन राज्यांची निर्मिती झाली होती. मात्र, शिवसेनेच्या प्रखर विरोधामुळे विदर्भ राज्याची निर्मिती होऊ शकली नाही. २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपने वेगळ्या विदर्भाचे आश्वासन दिले होते. 5 वर्षात भाजपने वचन न पाळल्यानेच विदर्भात भाजपला फटका बसल्याचा दावा विदर्भवादी करत आहेत.
हेही वाचा - बस वेळेत येत नसल्याने विद्यार्थ्यांनी शेवगाव येथे केले रास्ता रोको आंदोलन
नवीन वर्षच्या पहिल्या महिन्यात समितीतर्फे तिव्र आंदोलनांना सुरुवात केली जाणार आहे. ज्यामध्ये महावितरणच्या कार्यालयासमोर विजेचे दर कमी करण्यासाठी आणि शेती पंपाचे बिल संपवण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत. याशिवाय रास्ता रोकोसह रेलरोको आंदोलनसुद्धा केले जाणार आहे.