नागपूर - शहरात रविवारी दिवसभरात १५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. तर, एका कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला. यामुळे आता नागपुरातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३५६ वर पोहचली आहे. तर नागपुरात ६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
रविवारी दिवसभरात नागपुरात नोंद करण्यात आलेल्या कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांमध्ये अमरावतीचा एक पोलीस कर्मचारी व त्याच्या मुलाचाही समावेश आहे. अमरावतीहुन हा पोलीस कर्मचारी उपचारासाठी रुग्णवाहिकेतून नागपूरच्या शासकीय मेयो रुग्णालयात दाखल झाला होता. उपचारादरम्यान त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर, मुलाची तपासणी केली असता त्याचाही पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे. त्यामुळे, या पोलीस कर्मचाऱ्याला नागपुरात सोडून अमरावतीला परत गेलेल्या रुग्णवाहिकेचा चालक व डॉक्टरला अमरावतीच्या रुग्णालयात दाखल करून नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
नागपूरच्या शांतीनगर परिसरातील एका ५४ वर्षीय व्यक्तीला मेयो रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात येण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर, मेयो शासकीय रुग्णालयातून रविवारी १० जण कोरोनामुक्त झाले आहेत. ज्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २०८ एवढी झाली आहे.