नागपूर - रोबोट बघण्याची उत्सुकता अनेकांना असते. चित्रपटात आपण आजवर अनेक रोबोट पाहिले आहेत. पण जर प्रत्यक्षात एखादा रोबोट तुमच्या सेवेत हजर झाला तर! नागपुरातील एक रेस्टॉरंटमध्ये १ नव्हे तर ३ खऱ्याखुऱ्या ३ रोबोट्सची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच हा प्रयोग केला जात असून आता नागपुरकरांना रोबोटची सेवा अनुभवण्याची सुवर्णसंधी लाभली आहे.
रोबोटचा दैनंदिन जीवनासाठी वापर केला जातो हे आजवर आपण चित्रपटातच बघितले आहे. मात्र, आता हे चित्रपटापुरतच मर्यादित नसून प्रत्यक्ष जीवनात देखील याचा उपयोग होऊ लागला आहे. जपान सारख्या तंत्रज्ञानात अग्रेसर असलेल्या देशात रोबोट हे वेटर म्हणून काम करताना अनेकांनी बघितले आहे. याच धर्तीवर नागपूरच्या 'रोबो 2.0' नावाच्या रेस्टॉरंटमध्ये देखील वेटर म्हणून चक्क रोबोटची नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा - मिहानमध्ये वाघाचा वावर, नामांकित कंपन्यांच्या कर्माचऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
चेन्नई, बंगरुळ, हैदराबाद, भुवनेश्वरमध्ये असे प्रयोग आधी झाले आहेत. मात्र, महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच नागपुरात हा प्रयोग केला जात आहे. 'रोबो 2.0' या रेस्टॉरंटमध्ये एकूण ३ रोबोट आहेत. यातील एका रोबोटची किंमत ५ लाख असून जपानवरून हे रोबोट आयात करण्यात आले आहेत. या रोबोटला ऑपरेट करण्यासाठी एक अप्लिकेशन तयार करण्यात आले. या अॅप्लिकेशनवरून कमांड दिल्यानुसार हे रोबोट काम करतात. जमिनीवर लागलेल्या मॅग्नेटिक चीपमुळे ते हालचाल करतात. तसेच, प्रत्येक टेबलसमोर लागलेल्या इलेक्ट्रॉनीक चीपमुळे त्यांना कुठे जेवण वाढायचं आहे, हे सांगितले जाते. त्याप्रमाणे रोबोट ती आज्ञा पाळत टेबलजवळ जाऊन थांबतात. रोबोट चालत असताना जर कुणी मध्ये आलं तर, सेन्सरमुळे रोबोट थांबतो आणि पुढे जाण्याकरता रस्ता मागतो. तर, योग्य टेबलपर्यंत पोहोचल्यावर 'डियर कस्टमर! प्लीज टेक युअर मिल' अशी उद्घोषणासुद्धा हा रोबोट करतो. राज्यात असा हा पहिलाच प्रयोग आसून ग्राहक देखील मोठ्या कुतूहलाने इथे येत आहेत. विशेष करून तरुणांमध्ये या रोबोट्सबाबत अधिक उत्सुकता बघायला मिळत आहे.
हेही वाचा - जगातील कमी उंचीची महिला ज्योती आमगेच्या घरात चोरी