नागपूर- शहरातील कुख्यात गुंड विजय मोहोड याची प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांनी अपहरण करून निर्घृण हत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. मोहोडच्या हत्येने नागपूर शहरात खळबळ उडाली आहे. विजय मोहोड हा कुख्यात गुन्हेगार होता. त्याच्याविरुद्ध हत्या, हत्येचा प्रयत्न या सारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल होते.
विजय हा गुन्हेगारीकडून सामाजिक क्षेत्राकडे वळण्याचा प्रयत्नात होता. रविवारी रात्री विजय मोहोड त्याच्या मित्रांसोबत पार्टीसाठी गेला होता. यावेळी त्याच्या प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांनी त्याचे अपहरण केले होते. या घटनेची माहिती समजताच हुडकेश्वर पोलिसांनी लगेच विजयचा शोध घेण्यासाठी धावपळ सुरू केली. मात्र, पोलिसांना विजयचा पत्ता लागला नाही. मात्र, आज वेळाहरी परिसरात विजयचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह दिसून आला.
या संदर्भात पोलिसांना माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकल रुग्णालयात पाठवला. विजयच्या साथीदारांना या संदर्भांत माहिती समजताच त्यांनी देखील मेडिकल रुग्णालय गाठले होते. त्यामुळे तेथे काही काळ वातावरण तापले होते. मात्र, पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, भविष्यात विजयच्या हत्येनंतर गँगवार भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.