नागपूर - कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, तर कुटुंबातील इतर सदस्यांना संस्थात्मक क्वारंटाइन केले. त्यामुळे घरात कोणीच नसल्याचा फायदा चोरट्यांनी घेतला. घरातील लाखो रुपयांच्या मुद्देमालावर चोरट्यांनी हात साफ केला असल्याचा प्रकार नागपूरच्या कुशीनगर परिसरात घडला आहे. मात्र, चोरी झालेले घर सॅनिटाईझ नसल्याने त्याठिकाणी तपासाला पोलिसांनी नकार दिला.
नागपूरच्या कुशीनगर परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील एक सदस्याला १२ जुलैला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे त्या सदस्याला रुग्णालयात, तर इतर सदस्यांना संस्थांत्मक क्वारंटाइन करण्यात आले. याचाच फायदा घेत चोरट्यांनी या कुटुंबाच्या घरात चोरी केली. चोरट्यांनी तब्बल 1 लाख 75 हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
याबाबत जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. मात्र, हा परिसर कंटेन्मेंट झोन असून पालिकेने गेली 10 दिवस येथे सॅनिटाईझ केले नसल्याचे सांगत पोलिसांनी तपास करण्यास नकार दिला. मात्र, महापालिकेकडून सॅनिटाईझ करताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.