नागपूर - वीर सावरकर यांचा अपमान करण्याचा कोणालाही अधिकार नसल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. नागपुरातील शंकर नगर येथे 'सावरकर गौरव यात्रे'त आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलत होते. गडकरी म्हणाले की, राहुल गांधींनी हे लक्षात घेतले पाहिजे की त्यांनी काही गैरसमजांमुळे हिंदुत्वाच्या प्रतिकाचा अपमान केला आहे.
माजी काँग्रेस अध्यक्षांनी मोठे मन दाखवावे आणि त्यांच्या गुन्ह्यासाठी माफी मागावी, असेही गडकरींनी म्हटले आहे. त्यांना सावरकरांचा अपमान करण्याचा अधिकार कोणी दिला? देशात सावरकरांचा अपमान कोणीही सहन करणार नाही, असे गडकरी म्हणाले.राहुल गांधींनी सावरकरांविरोधा वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राज्यात भाजपने सावरकर गौरव यात्रा काढली. त्याबाबत बोलताना गडकरी म्हणाले, की राहुल गांधींमुळे देशातील तरुणांना सावरकरांच्या जीवनाची आणि संदेशाची जाणीव करून देण्याची भाजपला संधी मिळाली आहे. या शब्दांत आभार मानत त्यांनी राहुल यांना टोला लगावला आहे.
भाजपसह एकनाथ शिंदे यांनी काढली सावरकर गौरव यात्रा-मोदींच्या आडनावाबद्दल राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्याबाबत लोकसभेत बोलताना सावरकरांवर राहुल गांधींनी टीका केली. ते म्हणाले, की माझे नाव सावरकर नसून माझे नाव गांधी आहे. गांधी कोणाचीही माफी मागू शकत नाहीत. भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने हिंदुत्ववादी विचारसरणीचा सन्मान करण्यासाठी राज्यभरात सावरकर गौरव यात्रा काढली.
फडणवीसांनीदेखील राहुल गांधींवर केली टीका काही लोक सावरकरांबद्दल बोलून त्यांना शिव्या शाप देत आहेत. त्यांना सांगावं लागते की तुमची कुठलीही ओळख नाही. राहुल गांधी म्हणाले आहेत की, मी माफी मागायला सावरकर नाही. अरे काँग्रेसमध्ये सावरकर होण्याची योग्यता नाही. त्यासाठी त्यागासह तप लागते. सावरकर होण्यासाठी मातृभूमीकरिता यातना सोसाव्या लागतात. संडासला जेवढी जागा असते त्यापेक्षा कमी जागेत अंदमान कोठडीत ११ वर्षे राहावे लागते. तेव्हा खऱ्या अर्थाने सावरकर होता येते, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेससह राहुल गांधी यांना लगावला आहे.
हेही वाचा- Devendra Fadvanis On Savarkar Issue : सावरकर होण्याची योग्यता काँग्रेसमध्ये नाही- देवेंद्र फडणवीस