नागपूर - दोनच दिवसांपूर्वी लोहिया अभ्यास केंद्राचे सरचिटणीस आणि समाजवादी विचारवंत हरीश अड्याळकर यांचे कोरोनामुळे निधन झाले होते. ही घटना नागपूरकरांच्या पचनी पडण्याआधीच हरीश अड्याळकर यांच्या मुलाचेही कोरोनामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे संपूर्ण अड्याळकर कुटुंब दुःखात बुडाले आहे.
नितीन अड्याळकर हे 42 वर्षांचे होते. त्यांचे वडील हरीश अड्याळकर यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर नितीन देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. मात्र, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा लक्षण नसल्याने ते गृह विलागीकरनात होते. पण, वडिलांच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर ते अस्वस्थ झाले होते. आज सकाळपासून त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास जाणवू लागल्याने शासकीय रुग्णालयात दाखल करण्याचा हालचाली सुरू झाल्या होत्या.
रुग्णवाहिकेतून त्यांना शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे अड्याळकर कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
हेही वाचा - नागपुरात कोरोनाचा हाहाकार, सलग पाच दिवसात ८५८४ रुग्णांची नोंद