नागपूर - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका पाहाता ग्रामीण भागातील नागरिकांचे शंभरटक्के लसीकरण करणे आवश्यक आहे. त्याबरोबच आरोग्य यंत्रणा बळकट व सुसज्ज करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज केले. आज त्यांनी कामठी, मौदा, कुही व उमरेड येथील ग्रामीण रुग्णालय आणि कोविड सेंटरला भेट दिली, त्यावेळी ते बोलत होते.
कोविडची दुसरी लाट ओसरत असली तरी गाफील राहून चालणार नाही, असे सांगून पालकमंत्री म्हणाले की लसीकरणानेच कोरोनावर मात करता येईल. लसीकरणाबाबत अनेक गैरसमज असल्यामुळे ग्रामीण भागातील लसीकरणाचा टक्का कमी आहे. तो वाढविण्यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज आहे. ग्रामीण भागात सरपंच व लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेवून कोरोना तसेच म्युकरमायकोसिस या आजाराबाबत प्रभावी जनजागृती करणे आवश्यक आहे.
पालकमंत्र्यांची प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट
पालकमंत्र्यांनी यावेळी तारसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोविड सेंटरला भेट दिली. तेथील रुग्णांची विचारपूस केली. येथील लसीकरण प्रगतीपथावर असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यानंतर मौदा येथील ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन कोविड सेटरची पाहणी केली. वैद्यकीय अधिकारी डॉ. यु. के. पाटील यांच्याशी संवाद साधून कोरोना रुग्ण व लसीकरणाची माहिती घेतली. लसीकरण करताना नागरिकांच्या मनात असलेले प्रश्न किंवा भीती कमी करण्यासाठी त्यांच्याशी सवांद साधण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी दिल्या. त्यानंतर त्यांनी कुही व उमरेड येथील ग्रामीण रुग्णालयांना देखील भेटी दिल्या.
वर्ग -2 दर्जांच्या अधिकाऱ्यांनी स्वीकारले गावाचे पालकत्व
वर्ग-2 अधिकाऱ्यांनी एका- एका गावाचे पालकत्व स्विकारले आहे, हे अधिकारी गावात जाऊन कोरोना लसीकरणाबाबत ग्रामस्थांच्या मनात असलेले गैरसमज विविध माध्यमातून दूर करत आहेत. ते प्रशासनाने दिलेल्या चित्रफिती ग्रामपंचायत कार्यालयात दाखवून जगजागृती करत असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली.
हेही वाचा - ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणण्याचे पाप महाविकास आघाडीने केले - देवेंद्र फडणवीस