नागपूर - पक्षातील काही नेते जरी पक्ष सोडून गेले तरी कार्यकर्ते व जनता ही शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या विचारांवर श्रद्धा ठेऊन काम करत आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी शक्ती दाखवेल असे वक्तव्य राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे काढण्यात आलेली शिव स्वराज्य यात्रा बुधवारी नागपुरात पोहचली. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे आदी नेत्यांनी दीक्षाभूमी येथे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले, यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा विधानसभा मतदार संघातील भाजपचे माजी आमदार विजय घोडमारे यांच्याशी भेट झाली आहे. तसेच याच विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी नेते रमेश बंग यांच्याशी देखील चर्चा झाली असून या मतदार संघातील उमेदवारीबाबत येत्या २-३ दिवसात तोडगा निघेल असेही पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा - आघाडीतही 'इनकमिंग'...भाजपचे माजी आमदार करणार राष्ट्रवादीत प्रवेश?
तसेच भाजप व सेने मधील जुने कार्यकर्ते व नेते आमच्या संपर्कात असल्याची माहिती पाटील यांनी दिली. परंतु मुख्यमंत्री फडणवीस साम-दाम-दंडाचा वापर करीत असल्याने संपर्कात असलेल्या इतर पक्षातील नेत्यांची नावे सांगणार नाही असेही पाटील यावेळी म्हणाले. तर, आघाडीत जागावाटप बाबत चर्चा सुरू असून ज्या उमेदवारांत निवडणून येण्याची क्षमता आहे अशांना उमेदवारी देण्यात येईल असेही पाटील यांनी सांगितले.