नागपूर : बऱ्याच दिवसानंतर राज्यात ईडीने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. या कारवाईत आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही, अशा कारवाया आता चालूच राहणार आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. ते नागपूर विमानतळावर बोलत होते.
मुख्यमंत्र्यांवर टीका : वर्षभरापूर्वी सत्ता संघर्षाचा डाव फसला असता तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःच्या डोक्यात गोळी घालणार होते. असा गौप्यस्फोट सरकारचे मंत्री दीपक केसरकर यांनी केल्यानंतर यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की सत्ता हे सर्वस्व आहे. सत्ता मिळाली नाही तर, मी माझ्या जीवाचे बरे वाईट करून घेईल. म्हणजे हा एका प्रकारे लोकशाहीचा पराभव आहे. सत्ता सर्वस्व नसते. लोकशाहीत तुम्हाला जनतेच्या समोर जावे लागते. जय पराजय हा आयुष्यातला अविभाज्य घटक आहे. जनतेच्या समोर जा, जनतेचे मत मिळवा आणि सत्तेवर या असे खडे बोल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सुनावले आहे.
शिंदेला मुख्यमंत्री व्हायचे होते : महाविकास आघाडी स्थापन होण्याच्या अगोदर पासूनच एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या बरोबर नव्हते. कोणाला त्यांचे व्यक्तिगत पुरावा जेव्हा पाहिजे असेल तर मी पुरावा द्यायला तयार असल्याचा गौप्यस्फोट जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. योग्य वेळ आल्यावर मी पुरावा देईल. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वीच मी मुख्यमंत्री झालो पाहिजे असे एकनाथ शिंदे यांच्या मनात होते असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
५० खोके जनतेच्या मनात बसले आहे : विरोधकांकडे सरकारला घेरण्यासाठी कोणतेही मुद्दे शिल्लक नाहीत, म्हणून ते ५० खोक्यांचा अपप्रचार करत असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले आहेत. यासंदर्भात बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, जे घडले महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या विरोधात होते. कर्नाटकमध्ये ४० टक्यांवर सरकार गेले. ५० खोके सगळ्यांच्या मनामनात बसले, गाई, म्हशी गाढवावर ५० खोके लिहले जाते, यावरून तुमच्या मनात जनतेत किती राग आहे हे लक्षात येईल अशी प्रतिक्रिया आव्हाढ यांनी दिली आहे.
अब्दुल सत्तारवर कारवाईची हिम्मत नाही : पुढे बोलतांना आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई करण्याची सरकारची हिम्मत नाही. ते कसेही वागले तरी त्यांना काही होणार नाही. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून खाली आणण्यासाठी ४० आमदार गेले, ते उद्या पोकलेन घेऊन अख्खा महाराष्ट्र घेऊन लुटायला बाहेर पडले, तरी त्यांना रोखणारा कोणीच नाही अशी टीका देखील आव्हाढ यांनी शिंदे सरकारवर केली आहे.