नागपूर - परमबीर सिंग यांच्यासरख्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गृहमंत्र्यांवर आरोप करावेत हे गंभीर आहे. खरतर शासकीय अधिकाऱ्याने न्यायालयात जाताना शासनाची परवानगी घेणे अवश्यक असते. केंद्र शासनाच्या आशीर्वादाने हे होत आहे. कारण रोहतगी हे केंद्राचे वकील आहेत, आता तेच परमबीर सिंग यांचे वकील झाले आहेत. त्यामुळे यांच्यामध्ये काय कनेक्शन आहे ? हे जनतेला कळेलच अंस कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. ते शनिवारी नागपुरात बोलत होते.
जिलेटीनचे नागपूर कनेक्शन
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. मुख्य सचिवांनी तयार करून दिलेला अहवाल मंत्र्यांनी लिहून दिला, असे बालिशपणाचे वक्तव्य फडणवीस यांनी केले आहे, ते चुकीचे आहे. अंबानीच्या घरापूढे मिळालेले जिलेटीन हे नागपूरमधून गेले होते. तसेच पुलवामा हल्ल्यातील स्फोटके देखील नागपूरमधून गेले होते. याचे काय कनेक्शन आहे? याचीही चौकशी झाली पाहिजे, असेही यावेळी पटोले म्हणाले.
केंद्राकडून लसीचा अपुरा पुरवठा
नागपुरातच का कोरोना वाढतोय याकडे लक्ष दिले पाहिजे. केंद्र सरकारने कोरोनाला माहामारी घोषित केलं आहे, असे असताना मात्र लसीकरण पाहिजे त्या प्रमाणात होत नाही. सध्याच्या परिस्थितीत ज्या प्रमाणात लस उपलब्ध करून देण्यात आली आहे, ते प्रमाण अल्प आहे. आणखी लसीकरण होण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. दरम्यान काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - राज्यात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी - मुख्यमंत्री