नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर आज काँग्रेस पक्षाकडून देशभरात सत्याग्रह आंदोलन केले जात आहे. नागपुरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आले आहे. चोराला चोर म्हणणे जर चुकीचे असेल तर काँग्रेस ही चूक वारंवार करणार, असे वक्तव्य प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचे मित्र अदानीला कशी मदत करतात यासंदर्भात राहुल गांधी लोकसभेत खुलासा करणार होते, म्हणूनच त्यांची सदस्यता रद्द करण्यात आली, असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला आहे.
नागपूरात सत्याग्रह आंदोलन : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचे षड्यंत्र भाजपनेच घडवून आणले आहे. फक्त न्यायालायचे नाव पुढे केले असल्याचे ते म्हणाले आहेत. आम्ही इंग्रजांना घाबरलो नव्हतो तर यांना काय घाबरणार आहोत. भाजप विरोधातीलल आंदोलन आणखी तीव्र केले जाईल. भाजपच्या हुकूमशाहीचा विरोध करण्यासाठीचे सत्याग्रह आंदोलन आम्ही आजपासून करू, असे नाना पटोले म्हणाले आहेत.
अदानी प्रकरणावरून टीका : नाना पटोले यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. पटोले म्हणाले की, मी गावगुंड मोदी संदर्भात बोललो होतो, तरी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोचले. जेव्हा तो गाव गुंड आणि त्याची पत्नी समोर आली तेव्हा भाजपने आपले आंदोलन थांबवले होते. अदानीचे नाव घेतले तर यांना त्रास का होतो, असा प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.
सावरकरांवर प्रश्न : नाना पटोले पुढे म्हणाले की, मानहानी प्रकरणात काँग्रेस नेते राहुल गांधींनी माफी मागितली असती तर प्रकरण थांबले असते, असे भाजपकडून सांगितले जाते. सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली होती. त्याची अनेक तपशील समोर आली आहेत. सावरकरांना इंग्रजांकडून साठ रुपये महिना का मिळत होता, असा प्रश्न देखील नाना पटोले यांनी उपस्थित केला.
भाजप विरोधात लोकांमध्ये राग : जे नेते भाजपमध्ये प्रवेश करतात, त्यांना गुजरातच्या निरमा पावडर मध्ये धुतले जाते. भाजपची हुकूमशाही प्रवृत्ती आहे. भाजपला वाटते की ते सत्तेचा ताम्रपट घेऊन आले आहे. देशात गांधी नावाची मोठी ताकद आहे. लोकांवर अन्याय होतो तेव्हा देशाची जनताच न्याय देते. भाजप विरोधात लोकांमध्ये प्रचंड राग आहे. यामुळे देशातील जनता, शेतकरी, बेरोजगार, तरुण तसेच मागासवर्गीय यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे पटोले म्हणाले आहेत.
सरकार व न्यायव्यवस्थेत संघर्ष सुरू : नाना पटोले पुढे म्हणाले की, पंतप्रधान आणि कायदामंत्री खोटे बोलण्यात पटाईत आहे. त्यामुळे सरकार व न्यायव्यवस्थेत संघर्ष सुरू राहत आहे. हे संपूर्ण जग पाहत आहे आणि आता भाजप असे म्हणत असतील की आमच्यात कोणताही संघर्ष नाही आहे. तर ते मोदींच्या पावलावर पाऊल ठेवून खोट बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
हेही वाचा : Priyanka Gandhi On Modi : प्रियंका गांधींचा मोदींवर थेट हल्ला ; म्हणाल्या, पंतप्रधान भ्याड आहेत