नागपूर - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले शहरात आले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी नागपूरच्या रेल्वे स्थानकावर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. या गर्दीत नाना पटोले पाय घसरून खाली पडले. त्यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नसली तरी निवडणुकीपूर्वीच नाना पडल्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात मतदान होणार आहे. त्यामध्ये नागपूर जिल्ह्याचा समावेश आहे. काँग्रेसने नागपूरमधून माजी खासदार नाना पटोले यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच नाना पटोले दिल्लीवरून नागपूरला आले. नानांच्या स्वागतासाठी रेल्वे स्थानकावर शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. पटोले गर्दीतून वाट काढत गणेश टेकडी मंदिराकडे जात असताना अचानक गर्दी वाढल्याने नाना पाय घसरून पडले.