नागपूर - आता मी न्यायाच्या भूमिकेत असल्याने राजकीय व्यवस्थेशी माझा संबंध राहिलेला नाही, असे मत विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी येथील दीक्षाभूमी स्थळी जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. विधानसभाध्यक्षाचा पदभार स्वीकारल्यानंतर नाना पटोले पहिल्यांदाच शहरात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधाला.
शेतकरी नेते म्हणून नाना पटोले यांची ओळख आहे. विधानसभेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. तसेच विधानसभा अध्यक्ष म्हणून मोठी जबाबदारी आहे. या जबाबदारीची पूर्ण जाणीव आहे. तसेच विधिमंडळाच्या प्रथा परंपरा आणि नियमांचे पालन करून प्रत्येकाला न्याय देण्याची माझी भूमिका असल्याचे नाना पटोले म्हणाले. तसेच आता मी न्यायाच्या भूमिकेत असल्याने राजकीय व्यवस्थेशी माझा संबंध राहिलेला नसल्याचे सांगत त्यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य करणे टाळले.