नागपूर - कोरोनामुळे राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत संभ्रम कायम होता. त्यानंतर अनेक विचार विनिमयातून ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्याचा निर्णय शासनाने जाहिर केला. मुंबई विद्यापीठ पाठोपाठ आता नागपूर विद्यापीठाकडूनही अंतिम वर्षाच्या परीक्षेला आजपासून सुरूवात करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे विद्यापीठाकडून विकसित करण्यात आलेल्या अॅपवर ही परीक्षा देता येणार आहे. मात्र, अॅपसंदर्भात तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने ही विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेबद्दल धाकधूक असल्याचे पाहायला मिळत आहे.
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबत पेच निर्माण झाला होता. याबाबत अनेक मते मतांतर पहायला मिळत होते. त्यानंतर या सर्व बाबींवर तोडगा काढत अॉनलाईन परिक्षा घेण्याचा निर्णय जारी करण्यात आला.
दरम्यान, राज्य शासनाच्या निर्णयानुसार नुकतीच मुंबई विद्यापीठाच्या परिक्षेला सुरूवात करण्यात आली आहे. याच पाठोपाठ आजपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या अॉनलाईन परिक्षेला सुरूवात करण्यात आली आहे. विद्यापीठाने तयार केलेल्या अँपच्या माध्यमातून परिक्षा घेतल्या जात आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाकडून अॉनलाईन परिक्षेबाबत सर्व सूचना जारी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे परिक्षेदरम्यान अडचणी येणार नाही. असे विद्यापीठाकडून सांगण्यात येत आहे. असे असले तरी या अँपसंदर्भात तांत्रीक अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे इंटरनेट किंवा परिक्षेसंदर्भातील काही समस्या असेल तर त्या सोडवण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबरही जारी करण्यात आले आहे. जवळपास ६० ते ७० हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहे. शाखा निहाय परिक्षेबाबतचा वेळ ठरविण्यात आला आहे. परीक्षेतील पेपर हे ५० गुणांचे असून त्यापैकी २५ प्रश्ने सोडविणे अनिवार्य करण्यात आले आहे. या परिक्षेमुळे विद्यार्थ्यांना बौद्धिक कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे परिक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये काहीसी धाकधूक व कुतूहल पाहायला मिळत आहे.