नागपूर - महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं असून मुख्यमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटला नाही. सत्ता स्थापन करण्यासंदर्भात शिवसेना भाजपमधील संघर्ष इर्षेला पेटला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना मधून सध्याच्या राजकीय परिस्थितीवर लिहलं जात आहे. अशातच संघाचे मुखपत्र असलेला तरुण भारतदेखील आता रिंगणात उतरला आहे. आजच्या तरुण भारतच्या आग्रलेखातून अप्रत्यक्षपणे संजय राऊत यांचा उल्लेख बेताल आणि विदूषक असा केला आहे.
आजच्या तरुण भारत संपादकीय भागात पुराणातील विक्रम आणि वेताल या कथेचा संदर्भ घेत उद्धव आणि बेताल असा उल्लेख करण्यात आला आहे. विक्रमची उपमा उद्धव ठाकरे यांना तर वेताळची उपमा संजय राऊत यांना दिली आहे. उद्धव ठाकरेंची राजकीय समज, त्यांची परिपक्वता, समंजसपणा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे राज्याच्या विकासासाठी पोटतिडकीने काम करणार्या मुख्यमंत्र्यांशी असलेले त्यांचे घट्ट भावनिक ऋणानुबंध हे अवघ्या महाराष्ट्राला ठावूक आहेत. तरीही हा ‘बेताल’ शिवसेनेच्या छाताडावर बसल्याचे चित्र अनेकांसाठी वेदनादायी असल्याचं अग्रलेखामध्ये लिहलं आहे.
शिवसेना पक्षस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राजवटीमधून महाराष्ट्राची सुटका करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र हा बेताल बाळासाहेबांच्या संपूर्ण आयुष्याचा संघर्ष धुळीस मिळविण्याच्या मागे लागला आहे, असे तरुण भारतच्या संपादकीय भागात लिहण्यात आले आहे.
दरम्यान संजय राऊत यांनी आपल्याला तरुण भारत नावाचे वृत्तपत्रही आहे, हेच लक्षात नव्हते असा टोला लगावला आहे. आपण सामनाशिवाय दुसरे कुठलेच वृत्तपत्र वाचत नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
सोमवारी शिवसेनेचे शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे. सत्ता स्थापनेबाबत ही भेट असण्याची शक्यता आहे. मात्र, नेमकी राज्यपालांची भेट कशासाठी घेतली जाणार आहे, याबाबत शिवसेनेकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.